गयानातही हरला ना! दुसऱ्या टी-20 लढतीतही ‘यंग’ इंडियावर विंडीजची मात

निकोलस पूरनच्या झंझावाती 67 धावांच्या खेळीने विंडीजला यंग इंडियाविरुद्ध दुसऱया टी-20 लढतीतही दणदणीत विजय मिळवून दिला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी जोरदार आघाडी घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पूरनच हिंदुस्थानी गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला आणि तोच विजयाचा शिल्पकारही ठरला.

कसोटी आणि वन डेत दुबळय़ा भासणाऱया विंडीज संघाने टी-20 सलग दुसऱया सामन्यातही धक्कादायक निकालाची नोंद केली. आघाडीच्या स्टार खेळाडूंच्या अपयशी कामगिरीमुळे हिंदुस्थानला विंडीजच्या नवख्या गोलंदाजांनी 152 धावांत रोखून अर्धी लढाई जिंकली होती तर टी-20 तले वादळ असलेल्या निकोलस पूरनने 40 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांसह हिंदुस्थानच्या आव्हानातील हवाच काढून टाकली होती. तरीही हिंदुस्थानने 3 धावांत 4 विकेट एकतर्फी सामन्यात चुरस आणली, पण अल्झारी जोसेफ आणि अकील होसेनने नवव्या विकेटसाठी 27 धावांची अफलातून भागी रचत हिंदुस्थानच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी शुभमन गिल (7), सूर्यकुमार यादव (1), संजू सॅमसन (7) यांच्या निराशाजनक फलंदाजीनंतर तिलक वर्माने केलेल्या 51 धावांचा झुंजार खेळीने हिंदुस्थानला 20 षटकांत 7 बाद 152 अशी मजल मारता आली होती. विंडीजच्या अकील होसेन, अल्झारी जोसेफ आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेत हिंदुस्थानला 152 धावांवर रोखण्यात यश मिळविले होते.