रंगपट – हीच खरी आयुष्यातली नाटय़संपदा!

>>राज चिंचणकर

नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या सहवासातली हृद्य आठवण जागवत आहेत ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिडे…

प्रभाकरपंत पणशीकर यांच्या ‘नाटय़संपदा’ या संस्थेत काम करतानाचे दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाच्या कोल्हापूर दौऱयातला प्रयोग झाल्यानंतर आमच्या नाटकातले गौरू दळवी हे नट आजारी पडले. दुसऱया दिवशी पणशीकरांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले आणि ते म्हणाले, ‘‘आज नाटकातली प्रल्हाद निराजी आणि मल्होजी घोरपडे ही दोन्ही कामे तू कर.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘पंत, दोन्ही भूमिकांचे गेटअप उत्तर आणि दक्षिण ध्रुवासारखे आहेत.’’ यावर पंत एक शब्दसुद्धा बोलले नाहीत. त्यांनी फक्त इतकेच सांगितले, ‘‘तू काम करतोयस. विषय संपला.’’

आमच्या नाटकाचा तो प्रयोग हाऊसफुल्ल झाला होता. मी त्या भूमिकेचे पाठांतर करून रंगमंचावर उभा राहिलो. दुसऱया अंकातली प्रल्हाद निराजीची एक्झिट घेतली आणि मी मेकअप रूममध्ये गेलो. पण तिथले दृश्य पाहिल्यावर मी अचंबित झालो. प्रभाकर पणशीकर यांच्यासारखा एक मातब्बर निर्माता आणि नट हातात मल्होजी घोरपडे यांचे कपडे घेऊन उभा होता. त्यांनी मला कपडे घालायला मदत केली. अंगरख्याच्या गाठी मारल्या. मी योग्य वेळेला रंगभूमीवर एन्ट्री घेतली. हा प्रकार पुढचे तीन प्रयोग होईपर्यंत तसाच सुरू होता. संस्थेची पत टिकवण्यासाठी एवढा मोठा निर्माता कपडेपटात काम करणाऱया एका माणसासारखा वागला. पंतांची अशी वागणूक होती म्हणूनच ‘नाटय़संपदा’ मोठी झाली.

पण काळानुरूप पंतांचे वय झाले आणि ‘नाटय़संपदा’ बंद झाली. एक दिवस दुपारी पंतांनी त्यांच्या घरी बोलावले. ‘‘मी तुला बोलावले याचे कारण असे आहे की, मी आज तुला काहीतरी देणार आहे. पण ते मी वापरलेले आहे, तेव्हा तुला राग तर येणार नाही ना?’’ असं म्हणत त्यांनी मला समोरच्या कपाटातील एक बंडल बाहेर काढायला सांगितले.

त्यातील स्वच्छ धुऊन, इस्त्री करून ठेवलेले तीन झब्बे व एक धोतर मला दिले आणि म्हणाले, ‘‘ही माझी आठवण. अंगातला तुझा शर्ट काढ आणि यातला झब्बा घाल.’’ मी त्याप्रमाणे केले. एखादा ड्रेसमन जसे कपडे व्यवस्थित करतो तसा माझा झब्बा त्यांनी व्यवस्थित केला. क्षणभर माझ्या अंगावर प्रेमाचे मोरपीस फिरले. मी त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. पंतांनी मला जवळ उभे केले आणि आशीर्वाद देत ते म्हणाले, ‘‘तुझ्या सगळय़ा इच्छा पूर्ण होतील. तू माझ्याकडे असताना जी चांगली कामे होती, ती मी तुला दिली. नवीन नाटक नसल्यामुळे मी तुझ्यासाठी काहीही करू शकलो नाही. पण तुझे नशीब चांगले असेल तर तू मोठा होशील. तुझ्याकडे संचय खूप आहे.’’ या वेळी आमचे दोघांचेही डोळे पाणावले होते. घरी आल्यानंतर ते झब्बे मी माझ्या मुलाला दाखवल्यावर तो मला म्हणाला, ‘‘बाबा, हे केवळ झब्बे नाहीत, हा तर राष्ट्रपतींनी केलेला तुमचा सन्मान आहे.’’ प्रभाकरपंत अनंतात विलीन झाले. मात्र त्यांनी दिलेले आशीर्वाद माझ्याजवळ आठवण म्हणून कायम राहिले आहेत.