विदर्भातील अपयशाचा अंदाज आल्याने मोदींची जीभ घसरतेय

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित नाही. निवडणुकीतील अपयशाचा अंदाज आल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीभ घसरली आहे. जनतेच्या जिव्हाळय़ाचे विकासाचे मुद्दे सोडून द्वेषाचे, भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींकडून होत आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.

भाजपची मतांची घसरती टक्केवारी
सोलापूरमधील निवडणूक प्रचारसभेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देशात भाजपविरोधी मतविभागणी टाळण्यात ‘इंडिया’ आघाडी यशस्वी होत आहे. 2014 पूर्वी देशात भाजपला 20 ते 22 टक्क्यांच्या वर मते मिळत नव्हती. 2014 मध्ये भाजपला 31 टक्के मिळाली होती. नंतर 2019मध्ये पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपला 37 टक्के मते मिळाली. आता ती 30 टक्क्यांपर्यंत दिसतात. विरोधकांच्या मतांमध्ये म्हणजेच भाजपविरोधी मतांमध्ये विभागणी होत गेल्यामुळे भाजपाला सत्ता मिळत गेली. परंतु आता ही मतविभागणी टाळण्यात ‘इंडिया’ आघाडी यशस्वी होत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

वंचितच्या मतांचा टक्का खाली
अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीबरोबर घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न झाला, परंतु ‘वंचित’कडून स्वतः प्रकाश आंबेडकर चर्चेस आले नाहीत. त्यांनी दुय्यम फळीतील नेत्यांना पाठवले. या दुय्यम फळीतील नेत्यांची भाषा अपमानास्पद होती. जागावाटपात त्यांच्या अव्यवहार्य मागण्या मान्य करणे शक्य नव्हते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र असताना त्यांना सात टक्के मते मिळाली होती. त्यातून सोलापूरसह सात लोकसभा जागांवर भाजपविरोधी मतविभागणीचा महाविकास आघाडीला फटका बसला होता, परंतु आता त्यांच्यासोबत एमआयएम नाही. त्यामुळे ‘वंचित’च्या मतांचा टक्का तीन टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.