सेन्सेक्स, निफ्टीचा नवा रेकॉर्ड

पाच दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सुरू असलेली वाढ आजही कायम दिसली. मंगळवारी सेन्सेक्स 349 अंकांनी वधारून 73,057 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीने 74 अंकांच्या वाढीसह 22,196 अंकांच्या नव्या रेकॉर्डची नोंद केली. शेअर मार्पेटची गाडी सध्या वेगाच्या पटरीवर धावत आहे.

परंतु मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील नफाखोरीमुळे गुंतवणूकदारांना जोरदार झटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे तब्बल 11 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन मंगळवारी घसरून 391.58 लाख कोटी रुपयांवर आले. सोमवारी ते 391.69 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 11,000 कोटी रुपयांची घसरण झाली. बीएसई सेन्सेक्सच्या 30पैकी 18 शेअर्समध्ये वाढ झाली. यात पॉवर ग्रीडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4.16 टक्के वाढ झाली, तर टीसीएसच्या शेअरमध्ये सर्वात जास्त 1.55 टक्के घसरण पाहायला मिळाली. मिडपॅप इंडेक्स 0.17 टक्के आणि स्मॉलपॅप इंडेक्स 0.18 टक्के घसरणीसह बंद झाले.