व्हॉट्सऍपवरून सुरू होते सेक्स रॅकेट; मोबाईलमध्ये 35 महिलांचे फोटो आणि नंबर

व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा क्राईम ब्रँच युनिट 12 ने पर्दाफाश केला. याप्रकरणी निलेश पाटील आणि नरेंद्र देवरेला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी कारवाई करून तीन महिलांची सुटका केली आहे. त्या दोघांना पुढील कारवाईसाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

व्हॉट्सऍपवरून ग्राहकांना मुलीचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती युनिट 12 चे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले याना मिळाली. त्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, रासकर, महिला उपनिरीक्षक शेख आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी गुरुवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसराजवळ सापळा रचला. तेव्हा नरेंद्र हा तीन मुलींना गाडीतून घेऊन तेथे आला. पोलिसांनी कारवाई करून तीन मुलींची सुटका केली. तसेच नरेंद्रला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत निलेश पाटीलचे नाव समोर आले. त्यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.

निलेश हा मुख्य सूत्रधार असून तो गेल्या दीड वर्षापासून हे सेक्स रॅकेट चालवत होता. तो पीडित महिलांना इव्हेंट आणि डान्स क्लासच्या नावाखाली सेक्स रॅकेटमध्ये ओढत असायचा. निलेश हा ग्राहकांना महिलांचे फोटो व्हॉट्सऍपवर पाठवायचा. काही रक्कम तो महिलांना देत असायचा, तर नरेंद्र हा महिलांना ग्राहकांनी सांगितलेल्या ठिकाणी गाडीने सोडत असायचा. त्याला काही मोबदला मिळायचा. पोलिसांनी निलेशचा मोबाईल जप्त केला आहे. त्या मोबाईलमध्ये 35 महिलांचे नंबर आणि फोटो आढळून आले आहेत.