सेक्स्टॉर्शन करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या, रत्नागिरी पोलिसांची कामगिरी

एका अनोळखी हिंदी भाषिक इसमाने व्हॉट्‌सअपवर व्हाईस कॉल केला. व्हॉईस कॉल संपताच त्या इसमाने मॉर्फ केलेले फोटो पाठवले आणि ते फोटो त्या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवरील मित्रांना पाठवण्याची धमकी दिली आणि त्या बदल्यात गुगल पेच्या माध्यमातून 30 हजार रुपये मागितले. या प्रकरणाचा तपास खेड पोलीसांनी करताना राजस्थानमधील फतेहपूर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. चौकशीमध्ये तो आरोपी सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे निष्पन्न झाले.

ही घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन भोयर यांनी आपल्या पथकासह तपास सुरु केला. त्या हिंदी भाषिक इसमाला केलेल्या ऑनलाईन मनीट्रान्स्फरचा कसून तपास करण्यात आला. त्यावरुन तो आरोपी मेहजर अली इक्बाल हुसेन (रा. फतेहपुर, राजस्थान) असे त्याचे नाव असल्याचे उघडकीस आले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक राजस्थानला पाठवण्यात आले. मात्र तेथून तो आरोपी फरारी झाल्याचे पोलीसांना कळले. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधला आणि मेहजर अली इकबाल हुसेन याला अटक केली. गुन्ह्यातील शंभर टक्के रक्कम परत मिळवण्यात पोलीसांना यश आले. तपासामध्ये हा आरोपी सेक्स टॉर्शनच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत असल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी प्र.पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बांगर यांनी केली. पोलीसांनी आरोपीकडील 2 मोबाईल आणि 4 सीमकार्ड जप्त केली आहेत.