शांतीचे सूर – मुंबई संस्कृती महोत्सव रंगणार

इंडियन हेरिटेज सोसायटीचा मुंबई संस्कृती महोत्सव येत्या 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी पर्ह्ट येथील टाऊन हॉलच्या साक्षीने (एशियाटिक लायब्ररी) होणार आहे. महोत्सवाची सुरुवात शनिवारी प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या ‘कॉन्फ्लुएन्स -म्युझिक फॉर पीस अॅण्ड हार्मनी’ अर्थात ‘संगम-शांती आणि सुसंवादासाठी संगीत’ या कार्यक्रमाने होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे  रविवारी विदुषी अश्विनी भिडे देशपांडे आणि पंडित संजीव अभ्यंकर यांचा ‘भक्ती संगम’ हा कार्यक्रम सादर होईल.

 मुंबई संस्कृती महोत्सवाला 1992 मध्ये सुरुवात झाली. 1991 साली इंडियन हेरिटेज सोसायटीच्या अध्यक्षा अनिता गरवारे यांनी आताचा ऐतिहासिक परिसर अर्थात बाणगंगा तलाव जतन करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती. त्यातून 1992 पासून बाणगंगा महोत्सवाला सुरुवात झाली. बाणगंगा महोत्सव  आता मुंबई संस्कृती महोत्सव म्हणून नावारूपाला आला असून त्यात स्थापत्यशास्त्र आणि सांस्कृतिक वारसा यांचे एकत्रीकरण झाले आहे. यंदाचा मुंबई संस्कृती महोत्सव ‘वैश्विक शांतता’ ही संकल्पना अधोरेखित करणारा आहे, असे अनिता गरवारे यांनी सांगितले.