शरद मोहोळच्या खुनाचे कनेक्शन भाजपच्या मुळाशी? मारेकरी भाजपचा तत्कालीन युवा मोर्चाध्यक्ष

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना नुकतेच नवी मुंबईतून अटक केली आहे. अटकेतील आरोपींची संख्या 15 वर पोहोचली आहे. दरम्यान, अटक केलेला मुख्य आरोपी विठ्ठल शेलार हा भाजपशी संबंधित असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मोहोळचा मारेकरी भाजप आहे की आणखी दुसरे कोणी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विठ्ठल महादेव शेलार (36) आणि रामदास नानासाहेब मारणे (36, दोघेही रा. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मोहोळच्या खुनाप्रकरणी भाजपशीच संबंधित विठ्ठल शेलार सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे. मुळशी तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यासाठी शेलार काही काळ तालुकाध्यक्षही होता. त्याच्या माध्यमातून भाजपने पक्ष विस्तारासाठी प्रयत्न केले. त्यासाठी पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शेलारची पार्श्वभूमीही का तपासली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे शेलारने केले आहेत. संबंधित गुह्यात त्याला जामीन मिळाल्यानंतर 2017 मध्ये भाजपने त्याचा पक्षप्रवेश करून घेत त्याच्यावर मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी सोपविली. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलार याला पक्षप्रवेश दिला होता, तेव्हापासून तो भाजपचे काम वेगाने करीत होता.

खरे कोण, खोटे कोण

शरद मोहोळ हा गोरक्षक आणि धर्मरक्षक होता. याच्या हत्येचा एनआयए तपास करण्याची मागणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. एकीकडे पोलीस रेकॉर्डनुसार मोहोळ हा गँगस्टर होता, तर दुसरीकडे मात्र त्याला गोरक्षक, धर्मरक्षक म्हणण्याचे धाडस अनेकांकडून केले जात होते. त्यामुळे नेमके खरे कोण आणि खोटे कोण, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

मुळशीतील सराईत ते भाजप युवा मोर्चा अध्यक्ष

मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा विठ्ठल शेलार हा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. 2014 मध्ये मोक्काअंतर्गत कारवाईद्वारे त्याला अटकही झाली होती. त्यानंतर 2017 मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली. काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला. मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची युवा मोर्चाची जबाबदारी शेलावर सोपवली होती. त्याच्या भाजप प्रवेशानंतर पक्षावर टीका सुरू झाली होती. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री दिवंगत गिरीश बापट यांनी शेलारविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

मोहोळच्या पत्नीला भाजपने दिला प्रवेश

पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गँगस्टर शरद मोहोळची पत्नी स्वातीला भाजपमध्ये प्रवेश दिला होता. त्यांच्या वोटबँकद्वारे महानगरपालिका निवडणुकीत संधी दिली जाणार होती. त्यानंतर होणाऱया विधानसभा निवडणुकीत आपल्याला फायदा होईल, यासाठीच पाटील यांनी स्वाती मोहोळ यांचा प्रवेश करून घेतल्याचे बोलले जात आहे.