संविधानावर हल्ला करणाऱ्या भाजपविरोधात मतदान करा, शरद पवार यांचे मतदारांना आवाहन

भाजपला विरोध करणाऱ्या खासदार, आमदार, मंत्री यांना बंदी बनवण्याचं काम या सरकारने केलं आहे. हा देशाच्या संविधानावरचा आणि लोकशाहीवरचा हल्ला असून अशा हल्लेखोरांविरोधात मतदान करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या इंडिया आघाडीच्या लोकतंत्र बचाव महारॅलीत उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री यांच्याविरोधात ज्या प्रकारची कारवाई भाजप सरकारने केली आहे, तो लोकशाही आणि देशाच्या संविधानावरचा हल्ला आहे. जर संविधान आणि लोकशाहीला वाचवायचं असेल तर भाजपच्या अशा कृत्यांविषयी विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्या प्रकारे केजरीवाल, सोरेन यांना जेलमध्ये टाकण्यात आलं किंवा महाराष्ट्र, पश्चिम बंगालचे आमदार-खासदार यांच्याविरोधात कारवाई केली गेली, तो लोकशाही आणि संविधानावर केलेला हल्ला आहे.

या हल्ल्याविरोधात पाऊल उचलण्याची गरज असून त्यासाठी आपल्याला एकजूट व्हावं लागेल. भाजप आणि त्यांच्या कंपूविरोधात मतदान करावं आणि देशाला योग्य मार्गावर आणण्यात जनता किती महत्त्वाची असते ते दाखवून द्या, असं आवाहन शरद पवार यांनी मतदारांना केलं.