संघर्ष करणार! भाजपसोबत कदापि जाणार नाही!! दादा गटाचा समेटाचा प्रस्ताव धुडकावला; शरद पवारांचा निर्धार

हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. पुरोगामी भूमिका घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे. भाजपसोबत मला कदापि जायचे नसून आपल्याला संघर्ष करायचा आहे.

अजित पवार गटातील नेते आणि मंत्र्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांसमोर ते नतमस्तक झाले. त्यांची माफी मागितली. साहेब, तुम्हीही आमच्यासोबत चला, आपण राष्ट्रवादी काँग्रेसला एकसंध ठेवू, अशी गळ त्यांनी घातली. शरद पवार यांनी मात्र अजितदादा गटाचा हा समेटाचा प्रस्ताव सपशेल धुडकावून लावला आहे. भाजपसोबत कदापि जाणार नाही, संघर्ष करणार, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

शरद पवार हे आज नियमित कामकाजासाठी मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत होत्या. काही वेळानंतर अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांचा ताफा अचानकपणे तिथे पोहोचला. त्यांना पाहून प्रतिष्ठानमधील सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ आदी मंडळी होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झाल्यानंतर ते पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

शरद पवार यांची भेट घेऊन आल्यानंतर प्रतिष्ठानबाहेर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘‘आज आमचे दैवत शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो. शरद पवारांची वेळ न मागता संधी साधून आलो. त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले. राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहील यासाठी त्यांनी मार्गदर्शन करावे आणि एकत्र काम करूया अशी विनंतीही केली,’’ असे पटेल म्हणाले. पवार यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली असे माध्यमांनी विचारले असता, शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

अजित पवार व अन्य नेते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून गेल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन करून बोलवून घेतले. दोघेही महाविकास आघाडीची बैठक सोडून चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पोहोचले. शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांची नंतर बैठक झाली. त्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधला.

काहींची नक्कीच झोप उडाली असेल
राज्यात सुरू असलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर एका माध्यम समुहाने केलेल्या सर्व्हेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचा मूड दिसून आला आहे. एकदा नाही तर दोन वेळा कुरापती करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने काहींची झोप नक्कीच उडाली असणार. जनतेचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या विचारांचा मूड आणि भूमिका मात्र ‘क्रिस्टल क्लिअर’ आहे. यावरून सत्ता आणि पैसा कधीही जनतेसमोर आणि विचारधारेसमोर टिकाव धरू शकत नाही, हेच यातून स्पष्ट होत असून त्याचे प्रतिबिंब निवडणूकांमध्ये नक्कीच दिसेल असे सूचक ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी करत भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. अजित पवार गटातील आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर काही वेळातच त्यांनी हे ट्विट केले आहे.

ते माघारी आले तर मला आनंदच होईल
राष्ट्रवादी सोडून गेलेल्या लोकांनी शरद पवार यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. ते परत आले तर त्यांना पक्षात घेणार का अशा प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, ते माघारी आले तर पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला आनंदच होईल.

विठ्ठला… सांभाळून घे रे आम्हाला!
राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा गट बनवून सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर प्रथमच शरद पवार यांची भेट झाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना गहिवरून आले. पवारांसमोर येताच त्यांनी थेट त्यांचे पाय धरले. विठ्ठला, सांभाळून घे रे आम्हाला अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर अजित पवारांसह सर्वच पवारांसमोर नतमस्तक झाले. आम्हाला क्षमा करा आणि आशीर्वाद द्या, तुम्हीच आता काहीतरी मार्ग काढा, अशी विनंती त्यांनी केली. अजित पवार गटाचे नेते व मंत्री सुमारे तासभर चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होते. त्यादरम्यान त्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. पवार यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, परंतु स्वतःहून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अजित पवार यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे हे होते.