कोरोनाच्या धसक्याने शेअर बाजार धडाम, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले

कोरोनाचा धोका वाढत असल्याने बुधवारी शेअर बाजारावरही परिणाम दिसून आला. सेन्सेक्समध्ये 931 अंकांची घसरण झाली. बाजारात अचानक घसरण झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले असून त्यांचे एका दिवसात तब्बल 9.31 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बीएसईचे मिडकॅपआणि स्मॉलकॅप इंडेक्स 3 टक्क्यांहून जास्त घसरला. दुपारी 3 वाजेपर्यंत सेन्सेक्स 800 अंकांनी तर निफ्टी 200 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 70,506 अंकांवर बंद झाले तर निफ्टी 346 अंकांनी घसरून 21,106 अंकांवर बंद झाले. शेअर बाजारात आज जोरदार झटका बसला. शेअर बाजारातील 30पैकी 30 शेअर्समध्ये घसरण झाली. यात टाटा स्टील, एचसीएल टेक, भारतीय स्टेट बँक, टेक महिंद्रा, टाटा मोटर्सचे शेअर्स 3.13 टक्के ते 3.44 टक्क्यांपर्यंत घसरले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) मधील एकूण 3175 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

शेअर बाजार कोसळण्याची पाच कारणे

– 24 तासात कोविड-19 चे 600 हून जास्त नवीन केसेस.
– ख्रिसमस आणि न्यू ईयर हॉलिडेआधी यूरोपात कोविड-19 मुळे निर्बंध लागण्याची शक्यता.
-विदेशी गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानी शेअर बाजारातून 600 कोटी रुपये काढले.
– बँक, मेटल आणि ऑटो सेक्टर्समध्ये मोठी घसरण.
– वाढत्या बाजारात लागोपाठ नफाखोरी केली जात आहे.