पोटाची भूक ठरली कर्दनकाळ, तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील बफर झोन क्षेत्रात येणाऱ्या शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पेडगाव-बीटातील कक्ष क्रमांक 322मध्ये मौजा बामणीमाल येथील महिला दीपा दिलीप गेडाम (वय – 33) ही तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर झेप घेतली. वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली असून शनिवारी ही घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रामध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून तेंदूपत्ता तोडायचे काम सुरू आहे. आजूबाजूच्या गावातील स्त्री-पुरुष पोटाची भूक भागवण्यासाठी चार पैसे मिळतील म्हणून तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम करत आहेत. रोजच्याप्रमाणे शनिवारी सकाळी बामणीमाल गावातील महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी खातेरा जंगलातील कक्ष क्रमांक 322 मध्ये गेल्या असताना दबा धरून बसलेल्या वाघाने दीपा गेडाम हिच्यावर हल्ला केला.

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने वाघ पळून गेला. त्यानंतर या हल्ल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर दीपा गेडाम या मृतावस्थेत आढळल्या. वन विभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आणि वारसदाराला वनविभागाकडून तात्पुरती 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी ननपरिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार, गलगट क्षेत्र सहाय्यक वाय. एस. बुल्ले, क्षेत्र सहाय्यक पेंदोर, वनरक्षक मडावी उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

जंगलामध्ये तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जाताना स्त्री-पुरुषांनी एकटे जाऊ नये. समूहाने तेंदूपत्ता गोळा करावा आणि पहाटेच्या सुमारासही जाऊ नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट यांनी गावकऱ्यांना केले.