शिरीषायन – संस्कार आणि सौजन्य

शिरीष कणेकर

‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान मारामारीच्या सीनमध्ये टेबलाचा कोपरा अमिताभ बच्चनच्या पोटात घुसला. जखम झाली. ती चिघळत गेली. वाटलं होतं त्यापेक्षा प्रकरण गंभीर निघालं. अमिताभला

हॉस्पिटलमध्ये हलवावं लागलं. डॉक्टर्स झटून कामाला लागले. अख्ख्या देशाचे डोळे अमिताभच्या प्रकृतीत होणाऱया चढ-उतारांकडे लागले होते. चाहत्यांच्या सदिच्छेमुळे म्हणा, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे म्हणा किंवा अमिताभचं बाशिंगबळ उत्तम म्हणून म्हणा, जिवावर बेतलं असताना अमिताभ त्यातून बचावला. हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली  व लवकरच पूर्ण फिट होऊन तो कामाला लागला.

त्यानंतर शूटिंगच्या दरम्यान एका फ्लोअरवरून दुसऱया फ्लोअरवर जाताना अमिताभ व राजेश खन्ना अपघाताने समोरासमोर आले. राजेश अमिताभला म्हणाला, “सुना है के बीच में तेरी तबियत कुछ खराबसी थी. अब कैसा है तू?”

म्हणजे अख्खा देश काळजीत बुडाला होता ती गोष्ट राजेशच्या लेखी केवळ ’सुना है’ इतक्या फुटकळ, किरकोळ व बाष्कळ या सदरात मोडत होती. राजेशच्या तोंडचे नक्की शब्द दस्तुरखुद्द राजेशनेच मला सांगितले होते. त्याच्या लेखी अमिताभला जागा दाखवण्याचा हा यशस्वी कल्पक प्रयत्न होता.

परवा अमिताभ अक्षय कुमारला म्हणाला, “तुझ्या सासऱयाबरोबर काम करण्याच भाग्य मला लाभल!”

दोन सुपरस्टार्सच्या संस्कारांतील फरक लक्षात घ्या.

प् प् प्

“मी त्या माणसाला फोनवर म्हणाले” लता मला फोनवर सांगत होती, “तू घरी ये. मी दारातच तुला उभा चिरीन!”

“मग आला का तो घरी?”

“नाही. दारातच उभा चिरलं जाणं त्याला फारसं आवडत नसावं.” इति लता.

यावर काय बोलावं मला सुचेना. त्या माणसाचं नाव विचारायला मात्र मी आठवणीने विसरलो. शांत लताला एवढं भडकवणारा कोणी हिरण्यकश्यपूच असला पाहिजे.

“तुम्हाला माहित्येय, मी आयुष्यात एकाच माणसाच्या मुस्काटीत मारल्येय.” लताने दुसरा बॉम्ब फोडला. मी ऐकतच राहिलो. आता दुसरी मुस्काटीत माझ्या मारणार का, हा विनोद डोक्यातच आला नाही. लताच्या वक्तव्याच्या प्रक्षोभक पार्श्वभूमीवर विनोद कुठून फुलायला?

“काय झालं माहित्येय,” लता म्हणाली. “एक जण आमच्याकडे आला होता आणि बोलता बोलता तो त्याच्या आईला शिव्या द्यायला लागला. मी चकित झाले. आमच्याकडे असले काही चालत नाही. आम्ही घरी आईला देव मानतो. तिचाच शब्द चालतो. तिचा शब्द शेवटचा मानतो.”

“सौजन्य म्हणून थोडा काळ मी त्याची बत्तीशी ऐकून घेतली. सहन केली, पण तो थांबायचं नावच काढेना. गरळ ओकत राहिला. मी त्याला म्हणाले की, तुझ्या घरात जाऊन बोल. रस्त्यात उभा राहून  बोल. त्याच्या जिभेचा पट्टा अनिर्बंध चालूच राहिला. शेवटी माझा तोल गेला. मी खाडकन त्याच्या श्रीमुखात ठेवून दिली…”

थोडा पॉज घेऊन लताने मला विचारलं, “तो माणूस कोण होता हे जाणून घेण्याचं तुम्हाला औत्सुक्य नाही का?”

“आहे तर.” मी म्हणालो, “पण गंमत काय आहे सांगू का? मी विचारलं तर तुम्ही सांगालही. पुढेमागे ते वाचकांना सांगण्याचा मला मोह पडेल. मग ते सर्वतोंडी होईल. वाद निर्माण होईल. ज्यात दीदी तुम्ही आहात असा कुठलाही वाद मला नकोय.”

लता समजूतदारपणे हसली.

फोन ठेवताना तिने पटदिशी त्या आईला शिव्या देणाऱयाचं नाव सांगून टाकलं. मी अवाक् झालो व बंद झालेल्या फोनकडे बघत राहिलो.

 [email protected]