Lok Sabha Election 2024 : बुलढाणा लोकसभा मतदार संघात सरासरी 60 टक्के मतदान

बुलढाणा लोकसभेसाठी सरासरी 60 टक्के मतदान होईल असा अंदाज प्रशासन व्यक्त करत आहे. बुलढाणा लोकसभेसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, जळगाव जामोद, खामगाव, मेहकर, सिंदखेडराजा हे सहा विधानसभा मतदार संघ लोकसभा कार्यक्षेत्रात येतात. या सहाही मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 6.61 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती. सकाळी पाहिजे त्या प्रमाणात मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले नाही.

9 वाजेपर्यंत बुलढाणा विधानसभा मतदार संघात 4.42, चिखली 9.70 टक्के, जळगाव जामोद – 3.19 टक्के, खामगाव – 5.79 टक्के, मेहकर – 9.07 टक्के, सिंदखेडराजा – 7.40 टक्के झाले होते. दुपारी 11 वाजेपर्यंत सहाही मतदार संघात 17.92 टक्के मतदान झाले होते. दुपारी 1 वाजेपर्यंत 29.07 टक्के मतदान झाले. 3 वाजेपर्यंत 41.66 टक्के मतदान तर सायंकाळी 5 वाजता जिल्ह्यात सरासरी मतदान 52.24 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामध्ये सर्वाधिक मतदान मेहकर मतदार संघात 58.72 तर सर्वात कमी बुलढाणा विधानसभा मतदार संघात 42.67 टक्के, खामगाव 55.83 तर सिंदखेडराजा मतदार संघात 53.21 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने देवून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 60 टक्के मतदान होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघात कुठेही अनुचीत प्रकार घडला नसल्याचे पोलीस प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.

मतदान प्रक्रियेच्या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, पोलीस, होमगार्डस् सकाळी 7 वाजेपासून तैनात होते. अनेक ठिकाणी या कर्मचार्‍यांना साधे नाष्टा, जेवणाशिवाय उपाशी राहावे लागले. बुलढाणा नगरपरिषद कार्यालय आवारात 4 मतदान केंद्र होते. येथे तैनात काही पोलीस कर्मचार्‍यांना जेवणाचे डब्बे उशिरा मिळाल्याने ते खराब होऊन खाऊ शकले नाही, ते त्यांना मोकाट जनावरांना खाऊ घालावे लागले. जिल्ह्यात बुलढाणा सह अनेक गावात सायंकाळी पाच वाजेनंतर पावसाच्या सरी आल्यामुळे मतदार बाहेर पडले नाही. आज दुपारी कडक उन्ह होते. त्यामुळे मतदार सायंकाळी बाहेर पडतात, परंतु चार वाजेनंतर वातावरण बदलले व पाच वाजेदरम्यान पाऊस कोळल्याने अनेक मतदार घराबाहेर पडले नाही.

21 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद
बुलढाणा लोकसभेसाठी 21 उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. यामध्ये नरेंद्र दगडू खेडेकर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रतापराव गणपतराव जाधव – शिवसेना, रेखा वैâलास पोफळकर – अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील – बहुजन मुक्ती पक्ष, रविकांत चंद्रदास तूपकर – अपक्ष, असलम शहा हसन शहा – महाराष्ट्र विकास आघाडी, महंमद हसन इनामदार – मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टी, सूमन मधुकर तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे – अपक्ष, संदीप रामराव शेळके – अपक्ष, गजानन जर्नादन धांडे – अपक्ष, मच्छिंद्र शेषराव मघाडे – सोशालिस्ट पार्टी इंडिया, अशोक वामन हिवाळे – अपक्ष, वसंत राजाराम मगर – वंचित बहुजन आघाडी, संतोष भिमराव इंगळे – रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, विकास प्रकाश नांदवे – भिमसेना, बाळासाहेब रामचंद्र इंगळे – अपक्ष, दिनकर तुकाराम संबारे – अपक्ष, माधवराव सखाराम बनसोडे – बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, गौतम किसनराव मघाडे – बसपा असे एकूण 21 उमेदवार बुलढाण्याचा खासदार बनण्यासाठी उत्सुक आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यात 28 ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड
दुसर्‍या टप्प्यात आज बुलढाणा लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. मात्र जिल्ह्यातील 28 मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ईव्हीएम मशीन बिघडल्यानंतर काही वेळ मतदान थांबविण्यात आले. नंतर प्रशासनाने मशीन बदलवून दिल्या. मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्या. त्यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदार संघात 12 ठिकाणी, चिखली मतदारसंघात 2 ठिकाणी, खामगाव मध्ये 4, जळगाव जामोद 6 व मेहकर मध्ये 4 असे 28 ठिकाणी मशिन बिघाड झाले होते.

देऊळघाटमध्ये 45 मिनिटे मतदान थांबले
देऊळघाट येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना देखील घडली. त्यामुळे जवळपास 45 मिनिट मतदारांना थांबवावे लागले. बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट हे एक मोठे गाव आहे. या ठिकाणी एकूण 13 मतदान केंद्र असून 12 हजार 295 इतके मतदाता आहे. देऊळघाट येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 277 मधील ईव्हीएम मशीन मध्ये दुपारी 12 वाजता तांत्रिक बिघाड आल्याने जवळपास 45 मिनिटे या केंद्रावरील मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. बूथ अधिकारीने याची माहिती झोनल ऑफिसर महावीर मिरकुटे यांना दिली असता ते तात्काळ त्यांच्याकडे असलेली अतिरिक्त मशीन घेऊन मतदान केंद्रावर पोहोचले व तांत्रिक बिघाड आलेली मशीन बदलण्यात आली. बिघाड आलेल्या मशीनमध्ये 326 लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. पाऊण वाजता मशीन बदलून मॉकपोल घेण्यात आला. सध्या मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती झोनल अधिकारी महावीर निरकुटे यांनी दिली.