कोल्हापुरात मतदानाची टक्केवारी वाढली; चार तासात सरासरी 20 टक्क्यांहून जास्त मतदान

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 47- कोल्हापूर आणि 48-हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली.पहिल्या दोन तासात सरासरी साडे सात टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. तर 11 वाजपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदार संघात सरासरी 23.77 टक्के मतदान झाले होते. येथे करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 31.95 टक्के मतदान झाले. तर चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 20.56 टक्के मतदान झाले. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सरासरी 20.74 टक्के मतदान झाले. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 24.12 टक्के मतदान झाले. तर शाहुवाडी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 17.16 टक्के मतदान झाले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ निहाय प्रमाणे चंदगड-20.56, कागल-23.18,करवीर 31.95,कोल्हापूर उत्तर 23.24, कोल्हापूर दक्षिण 22.55 आणि राधानगरी 21.49 टक्के तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ निहाय प्रमाणे हातकणंगले 24.12, इचलकरंजी 20.26,शाहुवाडी 17.16,शिरोळ 21.10 तर सांगली जिल्ह्यातील समावेश असलेल्या ईश्वरपूर 21.70 आणि शिराळा 19.76 टक्के मतदान झाले होते.

जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली आहे. मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दत्ताबाळ हायस्कूल ,येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.अपर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी छत्रपती शाहू कॉलेज येथे मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी महागावकर हायस्कूल, कसबा बावडा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.