हिंदुस्थानी रिले संघाला पॅरिसचे तिकीट; बहामास जागतिक ऍथेलेटिक्स रिलेत पुरूष-महिला संघ ऑलिम्पिकला पात्र

हिंदुस्थानच्या महिला आणि पुरुष संघाने 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीसाठी पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले. बहामास येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स रिलेमध्ये सोमवारी हिंदुस्थानच्या दोन्ही संघांनी दुसरे स्थान मिळवीत ऑलिम्पिकची पात्रता मिळविली. आता हिंदुस्थानचे दोन्ही रिले संघ ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार आहेत.

रूपल चौधरी, एम. आर. पुवम्मा, ज्योतिका श्री दांडी व सुभा वेंकटेशन या हिंदुस्थानी चौकडीने 4 बाय 400 मीटरच्या रिले शर्यतीच्या दुसऱया हिटमध्ये 3 मिनिटे 29.35 सेपंद वेळेसह पूर्ण करीत दुसरे स्थान मिळविले. जमैकाच्या संघाने 3 मिनिटे 28.54 सेपंद वेळेसह अव्वल क्रमांक पटकाविला. याचबरोबर पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीतील दुसऱया हिटमध्ये मोहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अरोकिया राजीव व अमोज जॅकब या हिंदुस्थानी चौकडीने 3 मिनिटे 3.23 सेपंद वेळेसह दुसरा क्रमांक मिळविला. अमेरिकन पुरुष संघाने 2 मिनिटे 59.9 सेपंद वेळेसह अव्वल क्रमांक पटकाविला.

 पहिल्या फेरीत दोन्ही संघ ठरले होते अपयशी

रविवारी झालेल्या पहिल्या फेरीतील पात्रता हिटमध्ये हिंदुस्थानी महिला रिले संघ 3 मिनिटे 29.74 सेपंद वेळेसह पाचव्या स्थानी राहिला होता. दुसरीकडे राजेश रमेशने मध्येच माघार घेतल्याने हिंदुस्थानचा पुरुष रिले संघही पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवू शकला नव्हता. बहामास येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स रिले स्पर्धेतील तीन हिटमध्ये अव्वल दोन संघांना पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळणार आहे. हिंदुस्थानचे दोन्ही संघ दुसऱया हिटमध्ये दुसऱया स्थानी राहिल्याने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानकडे 19 ट्रक अॅण्ड फिल्ड अॅथलिट्स आहेत. टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राकडून यावेळीदेखील देशवासीयांना पदकाची आशा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील मुख्य आकर्षण असलेली अॅथलेटिक्स स्पर्धा 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.