मुंबईच्या अस्तानंतर सूर्योदय; सूर्याच्या शतकाने मुंबईचा विजय

आयपीएलमधील आव्हानाचा अस्त झाल्यानंतर मुंबईच्या विजयाचा सूर्य उगवला. सलग चार पराभवांनी खचलेल्या मुंबईच्या जखमेवर सूर्याच्या शतकी खेळीने हळुवार फुंकर मारत हैदराबादचा 16 चेंडू आणि 7 विकेटस्नी पराभव केला. मुंबईच्या विजयामुळे प्ले ऑफच्या समीकरणात हैदराबाद काहीसा मागे पडला आहे.

हैदराबादला आपली षटकारबाजी आज दाखवता आली नाही. ट्रव्हिस हेडने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत 48 धावा ठोकल्या; पण त्याच्या खेळीनंतर मयांक अगरवाल, नितीश रेड्डी, हेन्रीक क्लासन आणि माकाx यानसन हे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे हैदराबादची धावसंख्या थंडावली. हार्दिक पंडय़ा आणि पियुष चावलाने प्रत्येकी 3 विकेटस् घेत हैदराबादची 17 षटकांत 8 बाद 136 अशी अवस्था केली होती. तेव्हा कर्णधार पॅट कमिन्सने 17 चेंडूंत 35 धावांची खणखणीत खेळी करत संघाला 173 पर्यंत नेले. त्यामुळे त्यांना मुंबईसमोर चांगले आव्हान उभारता आले.

 पराभवाने पेटलेली मुंबई आज आपल्या उरल्यासुरल्या आत्मसन्मानासाठी खेळत होती, पण आजही नेहमीप्रमाणे त्यांची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा आणि ईशान किशनला आजही धावांचा फॉर्म्युला सापडला नाही. संधी मिळालेला नमन धीर शून्यावरच बाद झाला आणि मुंबईची 3 बाद 31 अशी बिकट स्थिती झाली. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव संकटमोचकासारखा धावून आला आणि त्याने तिलक वर्मासह 143 धावांची जबरदस्त भागी रचत मुंबईच्या पराभवाची मालिका खंडित केली. सूर्याने 51 व्या चेंडूंवर षटकार खेचत आपले आयपीएल कारकीर्दीतील दुसरे शतक साजरे केले. याचबरोबर हे यंदाच्या मोसमातील 12वे शतक ठरले. त्याने 6 षटकार आणि 12 चौकार खेचले. तोच विजयाचा शिल्पकार ठरला. एका आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम 2023 ला रचला गेला होता. त्याची आज बरोबरी साधली गेली. उर्वरित 19 सामन्यांत शतकांचा विक्रम मोडीत निघून नवा विक्रम रचला जाण्याची शक्यता आहे.