हिंदुस्थानी महिलांचा विजयी चौकार

हिंदुस्थानी महिलांनी द्विपक्षीय टी-20 क्रिकेट मालिकेत  यजमान बांगलादेशचा 56 धावांनी पराभव करीत विजयी चौकार ठोकला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार 14-14 षटकांच्या झालेल्या या लढतीत हिंदुस्थानने सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ केला. सर्वाधिक 39 धावांची खेळी करणारी कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्याची मानकरी ठरली. या विजयासह हिंदुस्थानने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी अजेय आघाडी घेतली. हिंदुस्थानकडून मिळालेल्या 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 7 बाद 68 धावांवरच मर्यादित राहिला. त्यांच्याकडून दिलेरा अक्तेर (21), रूबया हैदर (13) व शोरीफा खाटून (नाबाद 11) यांनाच फक्त दुहेरी धावा करता आल्या. हिंदुस्थानकडून दीप्ती शर्मा व पदार्पणवीर आशा सोभना यांनी 2-2 फलंदाज बाद केल्या. पूजा वस्त्राकर व राधा यादव यांनी 1-1 बळी टिपला.