टी-20 वर्ल्ड कपला इसिसची धमकी; विंडीजवर दहशतवादी हल्ल्याची व्हिडीओद्वारे संदेश

इसिस या दहशतवादी संघटनेने आता क्रिकेटलाही टार्गेट करण्याची धमकी दिल्याने क्रिकेट विश्व हादरले आहे. इसिसची पाकिस्तान शाखा असलेल्या आयएसखोरसनने आगामी टी-20 वर्ल्ड कपदरम्यान सहआयोजक असलेल्या वेस्ट इंडीजमध्ये दहशतवादी कारवाई करण्याची धमकी दिल्याची माहिती खुद्द त्रिनिदादचे पंतप्रधान किथ रोले यांनी दिली. या धमकीनंतर आगामी टी-20 वर्ल्ड कपदरम्यान सर्व शहरांना आणि स्टेडियमच्या आसपास कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार असल्याची माहिती दिली.

येत्या 1 जूनपासून अमेरिकेच्या न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि टेक्सास या शहरांमध्ये तर बार्बाडोस, जमैका, त्रिनिदाद, गयाना, सेंट विन्सेंट, सेंट लुसिया या पॅरेबियन बेटांवर टी-20 वर्ल्ड कपचा टी-20 वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही ठिकाणी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे प्रथमच आयोजन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर इसिस दहशतवादी संघटनेकडून आलेल्या धमकीच्या व्हिडीओने आयोजक हादरले आहेत. इसिसच्या उत्तर पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या आयएसखोरसन या दहशतवादी संघटनेने वर्ल्ड कपच्या कालावधीत अतिरेकी कारवाया करणार असल्याचा व्हिडीओ जारी केला आहे. या संघटनेने जागतिक क्रीडा स्पर्धेदरम्यान हिंसा भडकवणाऱया कारवायांना सुरुवात केल्याचे व्हिडीओद्वारे कळवले आहे. या व्हिडीओत त्यांनी असंख्य देशांतील अतिरेकी हल्ल्यांवर प्रकाश टाकत आपल्या समर्थकांना युद्धभूमीत सामील होण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडीओत इसिसने वेस्ट इंडीजच्या बेटांना टार्गेट करण्याचे म्हटले आहे. वर्ल्ड कपमधील सर्वाधिक सामने पॅरेबियन बेटांवर रंगणार आहेत. त्यामुळे 21 व्या शतकातही जगात दहशतवादी हल्ल्याचे वेगवेगळय़ा माध्यमातून संकट कायम आहे, हीच दुर्दैवी गोष्ट असल्याचे पंतप्रधान रोले यांनी एका स्थानिक वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

आयसीसी सर्वतोपरी सुरक्षा पुरवणार

स्पर्धेत सहभागी होणाऱया प्रत्येकाच्या सुरक्षेची आमची जबाबदारी आहे. सुरक्षितता हीच प्राथमिकता असेल आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत मजबूत यंत्रणा उभारली गेली असल्याची माहिती आयसीसीने दिली. यासंदर्भात आम्ही आयोजक आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या संपका&त आहोत आणि प्रत्येक गोष्टीवर करडी नजर ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणत्याही संकटाला आव्हान देण्यासाठी आम्ही स्थानिक आणि क्षेत्रीय स्तरावर यंत्रणेला सक्षम केले आहे. एवढेच नव्हे तर, राष्ट्रीय आणि खासगी सुरक्षा यंत्रणांही सुरक्षा व्यवस्थेवर काम करत असल्याची माहिती पंतप्रधान रोले यांनी दिली. विंडीजच्या सहाही स्टेडियम आणि परिसरावर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

धमकीमुळे विंडीजच्या पर्यटनालाही धोका

वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेटचे एक वेगळेच वातावरण आजवर पाहिले गेले आहे. तिथल्या रस्त्यांवर त्यांचे पंतप्रधानही सहजपणे फिरताना आजवर दिसत होते. जगातला कितीही मोठा खेळाडू असो किंवा राजकीय व्यक्ती, सारेच मुक्तपणे बिनधास्तपणे संचार करायचे, फिरायचे आणि पॅरेबियन बेटांचा मनमुराद आनंद लुटायचे. पण विंडीजवरील आयोजनाला आलेल्या इसिसच्या धमकीनंतर सारे चित्र बदललेले दिसणार हे निश्चित आहे. अत्यल्प लोकसंख्या असलेल्या पॅरेबियन बेटांवर सुरक्षा पुरवण्यासाठी आयसीसी आणि आयोजकांना फार मोठी यंत्रणा उभारावी लागणार आहे. अशा दहशतवादी हल्ल्यांसाठी पॅरेबियन बेटे कधीच तयार नव्हती. या बेटांचे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन हे पर्यटन हेच आहे. दहशतवादी धमकीमुळे टी-20 वर्ल्ड कपसाठी पॅरेबियन बेटांवर जाण्याचे प्लॅन आखणाऱया क्रिकेटप्रेमींना आणि पर्यटकांना पुन्हा नव्याने विचार करावा लागणार आहे. अशा धमकीनंतर मोठय़ा संख्येने पर्यटक आपला नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची अधिक शक्यता आहे. याचा थेट फटका विंडीजच्या पर्यटनाला बसणार आहे. 2007 च्या वर्ल्ड कप आयोजनावेळी हिंदुस्थानचा संघ साखळीतच बाद झाल्यामुळे आयोजकांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. पुन्हा एकदा क्रिकेट आयोजनामुळे विंडीजमध्ये त्याची पुनरावृत्तीची भीती निर्माण झाली आहे.