रत्नागिरी-सिंधुदुर्गात 11 वाजेपर्यंत 21.19 टक्के मतदान, मतदान शांततेत सुरू

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला.पहिल्या टप्प्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत या मतदारसंघात 21.19 टक्के मतदान झाले.उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक मतदारांनी सकाळी लवकर मतदान केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 51 हजार 630 मतदार आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरूवात झाली.सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 21.29 टक्क्यावर पोहचली.

त्यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात 24.18 टक्के,रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 15 टक्के, राजापूर विधानसभा मतदारसंघात 23.63 टक्के,कणकवली विधानसभा मतदारसंघात 22.09 टक्के,कुडाळ विधानसभा मतदारसंघात 21.04 टक्के,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 21.74 टक्के मतदान झाले.