चंद्राबाबू नायडूंनी वाढवली भाजपची डोकेदुखी; ओबीसीतून मुस्लिमांना आरक्षण देण्याला पाठिंबा दिल्याने झाली गोची

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारसंघांत भाजपाचे मित्रपक्षच डोकेदुखी वाढवत असल्याचे उघड झाले आहे. कर्नाटकात भाजपाला मित्रपक्ष जनता दलाचे (सेक्युलर) नेते प्रज्वल रेवण्णा आणि एचडी रेवण्णा यांच्या सेक्स स्पँडल प्रकरणामुळे जोरदार दणका बसला आहे. हे प्रकरण निस्तारत असतानाच आता आंध्र प्रदेशात मित्रपक्ष टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी ओबीसी आरक्षणात मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे अनेक नेते विरोधी पक्षाला ओबीसींचा हक्क मारायचा आहे, असा आरोप करत असताना चंद्राबाबू नायडू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपाची चांगलीच गोची झाली आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. आंध्र प्रदेशात मुस्लीम मतदारांचा विधानसभेच्या 40 ते 50 विधानसभा जागांवर प्रभाव आहे. नायडू यांनी मुस्लीम वोट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी मुस्लीम आरक्षणाची घोषणा केली. परंतु त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे.