कुलगाममध्ये LeT चा कमांडर बासित अहमद डारसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठे यश

 

देशात एकीकडे लोकसभेचे मतदान सुरू असून दुसरीकडे जम्मू – कश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. दक्षिण कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात रेडवानी पाईन भागात सुरू असलेल्या धुमश्चक्रीमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून लष्कर- ए -तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर कमांडर बासित अहमद डारसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. इतर दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

कुलगाम जिल्ह्यात रेडवानी पाईन भागात लष्करचे दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी सकाळी या भागात सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरू केली. याची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. याला सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर देत लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर कमांडर बासित अहमद डारसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

4 मे रोजी झालेला हल्ला

दरम्यान, 4 मे रोजी पुंछ जिल्ह्यात वायुदलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता, तर 4 जखमी झाले होते. या नंतर परिसराला घेराव घालत सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा शोध सुरू केलेला.