लेख – नद्यांची परिस्थिती : कालची आणि आजची!

>> रंगनाथ कोकणे

भारतीय लोकसंस्पृती आणि अध्यात्म संस्पृतीमध्ये नद्यांना पूजनीय मानले गेले आहे. मानवाच्या प्रगतीच्या टप्प्यांवर नजर टाकली असता नदीकाठाने संस्कृती वसली. कारण पाण्याशिवाय कोणताही जीव एक दिवसही व्यतीत करू शकत नाही. नद्या आपल्याला भरभरून देतात म्हणून नद्यांचे दैवतीकरण केले गेले, पण नद्यांची काही वर्षांपूर्वी असलेली परिस्थिती आणि आजची परिस्थिती यातील जमीन-अस्मानाचे अंतर आपल्याला जाणवत आहे. एकीकडे कारखान्यांमधून येणाऱया सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण आणि दुसरीकडे हवामान बदलांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या यामुळे गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा नद्यांसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या इन्स्टिटय़ूट फॉर स्टडी अँड डेव्हलपमेंट वर्ल्डवाईडने नुकताच हवामान बदलाशी संबंधित एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रेसह दक्षिण आशियातील प्रमुख नदीखोऱ्यांवर हवामान बदलाचा धोकादायक परिणाम जाणवणार असल्याचे म्हटले आहे. मानववंशजन्य क्रियाकलाप आणि हवामान बदलांचे आसपासच्या भागातील सुमारे एक अब्ज लोकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, तीन नद्यांवर (गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा) नदीच्या खोऱयाच्या व्यवस्थापनासाठी हवामान-प्रतिबंधक दृष्टिकोनाची तातडीने गरज आहे.

दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियाई देशांमधील खूप मोठय़ा लोकसंख्येसाठी हिंदपुश आणि हिमालय पर्वतशृंखला या गोडय़ा पाण्याचा प्रमुख स्रोत आहेत. या पर्वतराजींवर साचलेला बर्फ आणि ग्लेशियर्स हे आशियातील दहा प्रमुख नद्यांचे भवितव्य अवलंबून आहे. या क्षेत्रातील पावसावरही या पर्वतांचा आणि दऱयांचा प्रभाव आहे. एकटी गंगा नदी भारतीय उपखंडातील 60 कोटींहून अधिक लोकसंख्येसाठी जीवनदायिनी आहे. यावरून आपण नद्यांचे आणि पर्वतांचे आरोग्य बिघडल्यास काय होऊ शकते याची कल्पना येऊ शकेल.

वेगवान औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि सदोष पृषी पद्धतींचा नदीच्या पर्यावरणीय आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. सांडपाणी आणि औद्योगिक कचऱयाची अंदाधुंद विल्हेवाट लावल्याने पाणी गंभीरपणे प्रदूषित झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामुळे लोकांचे आरोग्य आणि पर्यावरण या दोघांनाही धोका निर्माण झाला आहे. याखेरीज हवामान बदलामुळे वाढत चाललेल्या महापुराच्या आणि दुष्काळाच्या घटनांचे आव्हानही वाढत आहे. जलस्रोतांचे पुनर्भरण होण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पावसाळ्यात आता हिमालयातील नद्यांना धोकादायक पूर येतो. हवामान बदलामुळे या घटना रौद्ररूप धारण करत असून त्याचे महिला, दिव्यांग आणि उपेक्षित समुदायांवर अत्यंत प्रतिपूल परिणाम होत आहेत. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनमधील 268 दशलक्षांहून अधिक लोकांची जीवनरेखा असलेली सिंधू नदी हवामान बदलामुळे संकटात सापडली आहे. वाढते तापमान, अनियमित मान्सून आणि पर्यावरणाचा ऱहास यामुळे सिंधू नदीच्या खोऱयाला संकटाकडे ढकलले जात आहे.

या अहवालानुसार, सिंधू खोऱ्यात हवामान बदलाचा प्रभाव खूप जास्त आहे. परिणामी, अन्न सुरक्षा, जीवनमान आणि जल सुरक्षा कमपुवत होत आहे. मान्सूनच्या पावसाच्या कालावधीत झालेल्या बदलांचा खोऱयाच्या आरोग्यावर आणि स्थैर्यावर आधीच गंभीर परिणाम होत आहे. याव्यतिरिक्त, पर्यावरणाचा ऱहास, पृषी आणि औद्योगिक प्रदूषण यामुळे नदीचे पर्यावरण बिघडत आहे. गोडय़ा पाण्यावर विपरीत परिणाम होत असून नदीचे पर्यावरणीय आरोग्य बिघडत आहे.

आशिया खंडातील महत्त्वाच्या या नद्यांच्या दुरवस्थेची मीमांसा केली असता असे लक्षात येईल की, बंधारे बांधून वाहणारे प्रवाह थांबवले गेले आणि तो मानवी विकासाचा अत्यावश्यक भाग मानला गेला तेव्हापासूनच नदीखोऱयांसाठी समस्या निर्माण होऊ लागल्या. विकासासाठी कारखाने आवश्यक आहेत, हे ठाशीव पद्धतीने जनमानसात पसरवण्यात आले, पण या कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी घटकांमुळे जीवनदायिनी असणाऱया, वर्षानुवर्षांपासून पुजल्या जाणाऱया नद्यांच्या आरोग्याला धोका येईल याचा विचारच केला गेला नाही. काठावर राहणाऱया लोकसंख्येची भूक आणि तहान शमवण्यास नद्या सक्षम होत्या, परंतु प्रदूषण करणाऱया कारखान्यांचा भार त्या सहन करू शकल्या नाहीत.

वास्तविक पाहता, जगातील विकसित देशांना खूप पूर्वी याचे आकलन झाले आणि त्यांची चूक समजली. त्यामुळेच ते आपल्या नद्या आणि पर्वतांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक बनले आहेत. नदी संवर्धनाचे विविध मार्ग शोधून त्यांनी बरीच प्रगती केली आहे; पण तथाकथित विकासाच्या शर्यतीत मागे पडलेल्या देशांना अजूनही मार्ग सापडलेला नाही. नद्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप अभ्यास अहवाल, सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे येतात. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होतात; पण परिणाम पाहिल्यास शून्य दिसतो.

नद्यांची काही वर्षांपूर्वी असलेली परिस्थिती आणि आजची परिस्थिती यातील जमीन-अस्मानचे अंतर आपल्याला जाणवत आहे. नदीकाठाने संस्पृती वसली. कारण पाण्याशिवाय कोणताही जीव एक दिवसही व्यतीत करू शकत नाही. नद्या आपल्याला भरभरून देतात म्हणून नद्यांचे दैवतीकरण केले गेले. नद्यांच्या काठांनीच देवळे उभारली गेली. नद्यांचे उत्सव साजरे होऊ लागले, परंतु हे सर्व नावापुरतेच उरले असून आता नद्यांचे विविध कारणांनी गटारीकरण सुरू आहे. शहरातील मैला, गावागावांमधील सांडपाणी, कारखान्यांची रसायने, साखर उद्योगांची मळी असे असंख्य घटक नद्यांमध्ये सर्रास सोडून देऊन आपण निर्धास्त झालो; पण त्यामुळे आपल्याला जीवन देणाऱया नद्याच इतक्या विकलांग झाल्या की, आता त्यांची अवस्था बघवतही नाही. धार्मिक विधी, पवित्र स्नान, निर्माल्य तसेच अंत्यविधी अशा अनेक कारणांनी आणि कारखान्यांमधील टाकाऊ पदार्थांनी नद्यांचे स्वरूपच बदलून गेले आहे. त्यातच अतिक्रमणे आणि वाळूसारख्या गौण खनिजांचे उत्खनन यामुळेही नद्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पर्यावरण चांगले असणे ही गोष्ट प्रत्येक प्राणिमात्रासाठी आणि वनस्पतीसाठी आवश्यक आहे, परंतु वास्तव मात्र नेमके याच्या उलट आहे.

अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये नद्यांवर बांधलेली धरणे काढून टाकली जात आहेत. मात्र भारतात जुने, जीर्ण बंधारे काढण्यासाठी अद्याप कोणतीही यंत्रणा तयार झालेली नाही. भारतात 100 वर्षांहून अधिक जुनी 234 धरणे आहेत, त्यापैकी अनेक धरणे 300 वर्षांहून अधिक जुनी आहेत. अल्पावधीत मुसळधार पावसाचा जो ट्रेंड गेल्या काही वर्षांत दिसत असून तो खूपच भीतीदायक आहे. अशा ढगफुटी किंवा अतिवृष्टीमुळे अचानक आलेला पूर आणि त्यामुळे जुन्या धरणांना होणारा संभाव्य धोका यासाठी आपण तयार आहोत का?

ताज्या अहवालात दक्षिण आशियातील प्रमुख नदी खोऱ्यांमध्ये हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्न आणि सर्वसमावेशक धोरणांच्या अंमलबजावणीची गरज प्रतिपादित केली आहे. केवळ सामूहिक प्रयत्नांमुळेच हे क्षेत्र हवामान बदलामुळे उद्भवणाऱया संभाव्य धोक्यांवर मात करू शकतो आणि लाखो लोकांचे जीवनमान वाचवू शकतो यावर भर देण्यात आला आहे. याबाबत धोरणकर्त्यांकडून आश्वासक पावले टाकली जातात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)