रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदारांचा उत्साह; सकाळी 9 वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत या मतदारसंघात 8.17 टक्के मतदान झाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक मतदारांनी सकाळी लवकर मतदान केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 51 हजार 630 मतदार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान झाले. त्यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात 10.13 टक्के, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 6 टक्के,राजापूर विधानसभा मतदारसंघात 10.09 टक्के,कणकवली विधानसभा मतदारसंघात 7 टक्के,कुडाळ विधानसभा मतदारसंघात 7.48 टक्के,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 8.39 टक्के मतदान झाले.मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही मतदान केंद्रावर रांगा होत्या तर काही मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती.

मॉकपोलदरम्यान केवळ 0.82 टक्के ईव्हीएम रिप्लेसमेंट

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण 1942 मतदान केंद्रावर आज सकाळी झालेल्या मॉकपोलमध्ये 0.82 टक्के बॅलेट युनिट, 0.36 टक्के सीयु आणि 0.77 टक्के व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. उत्तम प्रशिक्षण घेतल्यामुळे आणि सर्वोत्तम नियोजनामुळे मतदान प्रक्रिया सर्वत्र सुरळीत पार पडत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

सकाळी झालेल्या मॉकपोल दरम्यान एकूण 1942 मतदान केंद्रांवर 265 चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये एक बीयु, 4 व्हीव्हीपॅट, 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 5 बीयु, 1 सीयु आणि 2 व्हीव्हीपॅट , 267 राजापूर विधानसभा मतदार संघात 1 बीयु, 1 सीयु आणि 2 व्हीव्हीपॅट, 268 कणकवलीमध्ये 1 बीयु, 1 व्हीव्हीपॅट, 269 कुडाळमध्ये 6 बीयु, 4 सीयु आणि 4 व्हीव्हीपॅट आणि 270 सावंतवाडी 2 बीयु, 1 सीयु, 1 व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. हे प्रमाण एकूण मतदान केंद्राच्या केवळ 0.82 टक्के बॅलेट युनिट, 0.36 टक्के सीयु आणि 0.77 टक्के म्हाणजेच 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मॉकपोलनंतर सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.