मोदींच्या सभेमुळे नागरिकांचे हाल; ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी नाहीत, बस स्थानके ओस

भाजपच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने नगर शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. तर मुख्य बस स्थानकातील वाहतूकही बंद करण्यात आल्याने प्रवाशांनाहीअडचणींचा सामना करावा लागला. रुग्णालयात दाखल असलेल्यांच्या नातेवाईकांनाही प्रवास करता आला नाही, त्यामुळे सर्वसामान्यांकडून या सभेमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये सभेसाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळी लष्कराच्या हद्दीतील हेलिपॅडवर उतरून ते वाहनाने सभास्थळी जाणार आहेत. हे अंतर चार किलोमीटरचे असल्याने नगर-संभाजीनगर महामार्गाला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नगर शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मार्गाने जाणार आहेत, ते मार्ग बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शहरातील हे मध्यवर्ती भाग असल्याने अनेक नागरिकांचे हाल झाले. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे सांगितले होते. शहरातील रस्ते बंद केल्याने तारकपूर परिसरामध्ये एसटी स्थानकात अनेक प्रवासी अडकून पडले. या ठिकाणी एकही एसटी बस येत नसल्याने शहराबाहेर जाणाऱ्या नागरिकांचेही हाल झाले. तसेच बाहेरून नगरमध्ये येणाऱ्यांनाही रस्त्यातच ताटकळथ थांबावे लागले. यामुळे अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तारकपूर परिसरामध्ये नगर शहरातील रुग्णालये आहेत. या ठिकाणी अनेक जण उपचार घेत आहेत, तर ग्रामीण भागातूनही नागरिक या ठिकाणी उपचारासाठी आले आहेत. येथील रस्ते बंद केल्यामुळे त्यांना बाहेर पडलेही कठीण झाले आहे. त्याची वाहनेही बाहेर अडकून पडल्याने जायचे कसे अशा अचडणीत ते सापडले. जे या भागात राहतात त्यांना चार तास घराबाहेर पडता आले नाही.

सभेच्या स्थळी जाण्यासाठीही अनेकांना पायपिट करावी लागली. भर उन्हामध्ये किमान दोन दोन किलोमीटरचे अंतर चालत जावे लागले. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये असा प्रकार घडल्यामुळे अनेक जण मेटाकुटीला आले होते. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहने सभेसाठी येत होती. मात्र, ही वाहनेही थांबवण्यात येत असल्याने अनेकांनी आहे त्या ठिकाणी थांबणे पसंत केले. नगर शहरातील रहिवाशांनाही या सभेमुळे अडचणींचा सामना करावा लागला.