IPL 2024 : शशांक-बेयरस्टोचे वादळ गोंगावले; कोलकाताला नमवत पंजाबने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास

जॉनी बेयरस्टो नाबाद (48 चेंडू 108 धावा) आणि शशांक सिंग नाबाद (28 चेंडू 68 धावा) या जोडीने केलेल्या तुफान फलंदाजीमुळे कोलकाताने दिलेले 262 धावांचे लक्ष पंजाबने 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासोबत पंजाब टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा पहिला संघ ठरला आहे.

कोलकाताच्या इडन गार्डनवर चाहत्यांना षटकार आणि चौकारांचा पाऊल पाहायला मिळाला. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताची सलामीची जोडी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करण्याच्या हेतूने मैदानात उतरली. दोघांनी तुफानी फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. सॉल्टने 37 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. तर, सुनिल नारायणने 32 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. त्यानंतर वेकंटेश अय्यर (23 चेंडू 39 धावा), रस्सल (12 चेंडू 24 धावा) आणि श्रेयस अय्यर (10 चेंडू 28 धावा) यांनी केलेल्या चांगल्या फटकेबाजीमुळे कोलकाताने पंजाबला 262 धावांचे लक्ष दिले होते.

डोंगराएवढ्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी पंजाबचे सलामीवीर त्याच ताकदीने मैदानात उतरले. प्रभासिमरन सिंग आणि जॉनी बेयरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. प्रभासिमरन सिंगने फक्त 20 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा कुटल्या. तर जॉनी बेयरस्टोने 9 षटकार आणि 8 चौकार ठोकत नाबाद शतकी खेळी केली. त्याला शशांक सिंगची साथ मिळाली. शशांकने 8 खणखणीत षटकार आणि 2 चौकार ठोकत 68 धावा केल्या.