बारामतीत मतासाठी पैसे वाटले जात आहेत, रोहित पवारांचा गंभीर आरोप

बारामतीत पैसे वाटले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. पवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने पैसे वाटल्याचं म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटलं आहे की, अजितदादा घ्या….. #ED आणि #CBI ने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ… आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका.. आणि इतर लोकं तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत, असंही म्हणू नका!, असं रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

तसंच पवार यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ काटेवाडी इथला असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते एक्स अकाउंटवर लिहितात की, माजी सरपंच विद्यमान सरपंचाच्या मुलाला पैसे देताना हा आहे काटेवाडीतला (बारामती) व्हिडिओ…हे पैसे कशासाठी तर लोकांना देऊन मतं विकत घेण्यासाठी! पण मी काटेवाडीकरांना ओळखत असल्याने ते कदापि आपला स्वाभिमान गहान ठेवणार नाहीत. विचार, निष्ठा आणि आदरणीय पवार साहेबांसोबत राहून स्वाभिमानानेच मतदान करणार, असा ठाम विश्वास आहे! प्रश्न एवढाच आहे तिथली पोलिस यंत्रणा काय करतेय आणि निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार?, असा प्रश्नही रोहित पावर यांनी विचारला आहे.