5 जूननंतर सुरतच्या कोणत्याही बिळात लपलात तरी तुम्हाला उलटं लटकवल्याशिवाय राहणार नाही! उद्धव ठाकरे यांचा खणखणीत इशारा

”5 जूनला दिल्लीत व महाराष्ट्रात आपलं सरकार येणार आहे. त्यानंतर तुम्ही सुरतच्या कोणत्याही बिळात लपलात तरी तुम्हाला उलटं लटकवल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंध्यांना दिला आहे. धुळे येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे सरकारची सालटी काढली.

”भाजपवर आई वडिलांनी संस्कार केले की नाही असा प्रश्न सध्या पडत आहे. किती खालच्या स्तरावर जाऊन, वेडेवाकडे बोलत आहेत सध्या भाजपची लोकं. पंतप्रधान मोदींनी एका सभेत बोलताना मनमोहन सिंह रेनकोट घालून आंघोळ करतात असं म्हटलं होतं. पवार साहेबांना भटकती आत्मा बोलले. मोदीजी ही शिवछत्रपती व जिजाऊंची माती आहे. या मातीत आम्ही आमच्या मुलांवर असे बोलायचे संस्कार करत नाही. भाजपचे सुधीर मुनगंटीवार इतक्या नीचपणे,बिभत्सपणाने, विकृतपणे बहिण भावाच्या नात्यावर बोलले. बहिण भावाच्या पवित्र नात्याला बदनाम करतायत हे लोक आणि यांच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं. म्हणे मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे. अरे इथे यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. क्रिडापटू आंदोलनाला बसलेल्या तिथे तुम्ही गेला नाहीत, मणिपूरमधल्या महिलांची धिंड काढल्यानंतर त्यांना भेटायला कुणीही गेले नाही. कर्नाटकात प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराच्या वेळी मोदी म्हणाले होते की रेवण्णाला मत म्हणजे मला मत, मग त्याने केलेले गुन्हे मोदींच्या माथी मारले पाहिजेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”जळगाववरून हेलिकॉप्टरने आलो. त्यावेळी मी बघितलं संपूर्ण धुळं रखरखीत झालेलं आहे. दहा वर्ष झाले इथे एकच खासदार आहे धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवले आहेत त्यांनी. इथे कांदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची निर्यातबंदी उतरवत नाही. गुजरातच्या शेतकऱ्यांची उठवली. असा भेदभाव का करता. मोदीजी गेल्या दोन वेळेला महाराष्ट्राने तुम्हाला चाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून दिलेले. म्हणून तुम्ही दिल्लीत गेले होतात. पण यावेळेला महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली पर्यंत पोहचू देणार नाही. ४ जूनला तुमची एक्स्पायरी डेट आहे. या 4 जूनला बुरसटलेल्या भाजपला जनता केराच्या टोपलीत टाकणार आहेत आणि 5 जूनला आमचं सरकार आलेलं असेल. त्यानंतर तुम्ही कोणत्याही बिळात लपा. सुतरच्या बिळातही लपलात तरीही तुम्हाला उलटं लटकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

‘मोदीजींना चारशेपारचा आकडा हा संविधान बदलण्यासाठी हवा आहे. एका सामान्य कुटुंबातील, दलित कुटुंबातील तरुणाने लिहलेलं संविधान यांना पटत नाही. हा यांचा महाराष्ट्राबद्दलचा आकस आहे. हे यांचे बुरसटलेले गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. आम्ही हिंदू आहोत पण तुमच्यासारखे बुरसटेलेलं आमचे विचार नाही. आमचं हिंदुत्व मंदिरात घंटा बडवणारं नाही. तर देशद्रोह्याला बडवणारं आहे. एका सामान्य कुटुंबातल्या महाराष्ट्रातल्या तरुणाने घटना लिहली म्हणून हे घटना बदलत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अर्थमंत्री निर्मला सितारामन बोलल्या या देशात चार जाती आहेत. महिला गरिब युवा शेतकरी. काय केलं यांनी शेतकऱ्यांसाठी सोयाबिन, कापसाला भाव देत नाही. आज पेक्षा जास्त भाव आमच्या सरकारच्या काळात होता. म्हणजे यांनी गद्दारी ही फक्त शिवसेनेशी केलेली नाही. तर महाराष्ट्राशी केलेली आहे. दोन वेळेला निवडून दिलेल्या खासदाराला विचारा की इथली एमआयडीसी ओस का पडली आहे? साध्या साध्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घरी पोलीस पाठवता. भाजपात ये मिंध्यांकडे जा नाहीतर तुरुंगात जा असं धमकावलं जातं. हे असं बुरसटलेलं सरकार आपल्याला परत येऊ द्यायचं नाही. हे जर सरकार परत आलं तर तो जो प्रज्वल रेवण्णा पळून गेला आहे. त्याला परत बोलवतील त्याचा सन्मान करतील त्याला मंत्रीपद देतील. महिला व बालकल्याण मंत्रालय देतील. चालेलं तुम्हाला. पण आपलं सरकार आल्यावर त्याला पकडून आणू व मोदीजी तुमच्या गळ्यात बांधल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हीच म्हणालेलात ना रेवण्णाला मत म्हणजे तुम्हाला मत. मग त्याने केलेले गुन्हे मोदींच्या माथी मारले पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर आपलं लुटलेलं वैभव महाराष्ट्रात परत आणल्याशिवाय आपण राहणार नाही. छत्रपतींनी सुरत लुटलेली आणि हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात कुणी मर्द उरले नाहीत. सगळे मोदी भक्त अंध भक्त झाले आहेत. हा महाराष्ट्रा जागा आहे आणि महाराष्ट्रातल्या मातीतला पराक्रम अजूनही शिल्लक आहे. मोदीजी आम्ही आलिंगन देऊ पण कुणी आमच्या पाठीत वार केला तर महाराष्ट्र वाघ नख काढल्याशिवाय राहत नाही, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंध्यांना दिला आहे.