मराठवाड्यात मतदानाला उन्हाचा चटका! सकाळी गजबजाट, दुपारी शुकशुकाट

मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यात मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोलीसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा या आठ मतदारसंघात शुक्रवारी मतदान घेण्यात आले. कडक उन्हाचा मतदानावर चांगलाच परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. मतदान संपेपर्यंत मराठवाड्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले. नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे एका तरुणाने बेरोजगारीला वैतागून ईव्हीएम मशीनवर कुर्‍हाड घातली. मशीनबंदच्या घटना वगळता तीनही मतदारसंघात शांततेत मतदान झाले. किनवट तालुक्यातील पांगरपहाट येथे ग्रामस्थांनी सुविधांसाठी मतदानावर बहिष्कार टाकला. परभणी जिल्ह्यातील बलसा या पुनर्वसित गावाने मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु जिल्हाधिकार्‍यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावाने उत्स्फूर्तपणे मतदान केले. शुक्रवारी दाट लग्नतिथी होती. नवपरिणित वधु-वरांनी लग्नविधी उरकून मतदान केंद्र गाठल्याचे अनेक ठिकाणी बघायला मिळाले.

अठराव्या लोकसभेसाठी घेण्यात येणार्‍या मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात आज मतदान घेण्यात आले. सकाळी सात वाजता मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. अनेक केंद्रांवर मतदान कर्मचार्‍यांनी रांगेतील पहिल्या मतदाराचे स्वागत केले. बहुतेक केंद्रावर मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या. साधारण 11 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मोठी गर्दी होती. मात्र उन्हाचा तडाखा बसताच मतदान केंद्रे ओस पडली. सकाळी गजबजाट असलेल्या केंद्रांवर दुपारी शुकशुकाट होता. उन्हं उतरल्यावर दुपारी चारच्या नंतर पुन्हा मतदान केंद्र गजबजली. मतदानाची वेळ संपून गेली तरी अनेक केंद्रांवर रांगा लागलेल्या होत्या. हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीसह कळमनुरी, सेनगाव, वसमत तालुक्यांमध्ये सुरूवातीला मतदानाचा जोर कमी होता. मात्र उन्हाचा भर ओसरताच मतदारांनी पुन्हा रांगा लावल्या. सायंकाळपर्यंत या मतदारसंघात 52.03 टक्के मतदान झाले.

नांदेड जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे 65 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. रणरणत्या उन्हात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, मुखेड, नायगाव, भोकर, देगलूर या सहाही विधानसभा मतदारसंघात सकाळी मतदानाचा चांगला वेग बघावयास मिळाला. माध्यान्हकाळात मात्र अनेक मतदान केंद्र ओस पडली. उन्हं कलल्यानंतर मतदारांनी पुन्हा रांगा लावल्या. बिलोली तालुक्यात रामतीर्थ येथे भय्यासाहेब एडके या उच्चशिक्षित तरुणाने संतापाच्या भरात इव्हीएमवर कुर्‍हाड घातली. बेरोजगारीला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. किनवट तालुक्यातील पांगरपहाड येथे मोबाईल टॉवरच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. बोथ येथे डीपीच्या मागणीसाठी ग्रामस्थ अडून बसले होते. प्रशासनाने तेथे तात्काळ डीपी बसवली. त्यानंतर गावकर्‍यांनी मतदान केले. नवाखेडा येथे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. मात्र प्रशासनाने समजूत काढल्यानंतर येथे मतदान झाले.

आधी मतदान मग लग्न
26 एप्रिल ही लग्नाची दाट तिथी होती. नांदेड, परभणी तसेच हिंगोलीत आजच्या मुहुर्तावर अनेक लग्ने लागली. मात्र वर्‍हाड्यांनी अगोदर मतदान नंतर लग्न असा मुहुर्त साधला. नांदेड जिल्ह्यातील सायफळ येथील अंकुश गावंडे पाटील याचे लग्न इंद्रावली येथील पूजा हिच्यासोबत झाले. लग्नाला निघण्यापूर्वी वधूवरासह इतर वर्‍हाड्यांनीही मतदान उरकून घेतले. मुदखेड येथील पूनम आणि कृष्णा श्रीरामवार या नवदाम्पत्यानेही नांदेड लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. हिंगाली जिल्ह्यातील उटी ब्रह्मचारी येथील गोपाल पोहकर याचा विवाह सोहळा आमला येथे होणार होता. वर्‍हाड निघण्यापूर्वी नवरदेवासह इतरांनी मतदान केले.

सखी मतदान केंद्राची सजावट
हिंगोली शहरातील सिटीक्लब मैदानावर सखी केंद्र उभारण्यात आले. या केंद्राची सर्व जबाबदारी महिला कर्मचार्‍यांवर सोपवण्यात आली होती. या केंद्राची सजावट गुलाबी रंगाने करण्यात आली होती. मतदान कर्मचार्‍यांनीही गुलाबी रंगाचाच पेहराव केला होता.

बुलढाण्यात सरासरी 60 टक्के तर यवतमाळ-वाशिममध्ये 55 टक्के मतदान
बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज सरासरी 60 टक्के मतदान झाले. यावेळी जिल्ह्यातील खामगाव आणि भालेगाव येथील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बिघडल्याने काही काळ मतदान थांबवण्यात आले होते. त्यानंतर सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. यावेळी संवेदनशील मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तसेच कॅमेर्‍यांची करडी नजर होती, तर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्यामुळे अनेक मतदार ताटकळत उभे राहून प्रतीक्षा करीत होते. त्यानंतर दुपार व संध्याकाळच्या सत्रात नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. उन्हाचा चटका बसण्याअगोदरच मतदारांनी केंद्रावर गर्दी केली. दुपारी तापमान वाढताच मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरला. उन्हं उतरताच मतदान केंद्रे पुन्हा मतदारांनी गजबजून गेली. अनेक मतदान केंद्रांवर वेळ संपून गेली तरी रांगा कायम होत्या. येथे साधारण 55 टक्के मतदान झाले.

मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यात 13 राज्यांतील 88 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. मध्यप्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसपा उमेदवाराचे निधन झाल्यामुळे येथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू-कश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल या 13 राज्यात सरासरी 64. 64 टक्के मतदान झाले. दुसर्‍या टप्प्यात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर, भाजपच्या हेमा मालिनी आदी नेते नशिब आजमावत आहेत. या टप्प्यात एकुण 1202 उमेदवार रिंगणात आहेत.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेले मतदान
नांदेड – 65 टक्के
हिंगोली – 62.67 टक्के
परभणी – 62 टक्के
बुलढाणा – 52.54 टक्के
वर्धा – 56.66 टक्के
अमरावती – 54.50 टक्के
यवतमाळ-वाशीम  – 54.04 टक्के