अडीच कोटी द्या, ईव्हीएम हॅक करतो; अंबादास दानवे यांना जवानाचा फोन

लष्करातील एका जवानाने लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनला चीप बसवून हॅक करून तुमचे उमेदवार निवडून देतो असा दावा केला. त्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी वारंवार संपर्क करून अडीच कोटी रुपयांची मागणी केली. या जवानाला आज मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक लाख रुपये घेताना एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडण्यात यश आले असून त्याच्या विरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथर्डी (जि. नगर) तालुक्यातील काटेवाडी, पो. खरवंडी कासारा येथील मारुती नाथा ढाकणे (42) हा भारतीय सैन्य दलात हवालदार म्हणून उदमपूर, जम्मू-कश्मीर येथे कार्यरत आहे. तो गेल्या सहा महिन्यांपासून मी आर्मीत मेजर आहे, असे सांगून निवडणूक प्रक्रियेत नियोजनासाठी आपल्याला मदत करतो असे सांगत होता. या निवडणुकीच्या नियोजनासाठी वारंवार भेटण्याची मागणी करत होता. विरोधी पक्षनेता दानवे यांनी त्याची विचारपूस केली असता त्याने ईव्हीएम मशीनला चीप लावून आपले उमेदवार निवडणुकीत विजयी करून देतो असे सांगितले. त्याचे वारंवार कॉल येत असल्याने त्यांनी विरोधी पक्षनेता दानवे यांनी याबाबत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना कळविले होते.

n ढाकणे जम्मूत कार्यरत आहे. तो 55 दिवसाच्या सुटीवर आला होता. ईव्हीएम हॅक करून विजयी करून देण्याचे आमिष दाखवीत फसवणूक करत होता. दोन दिवसांत त्याची सुटी संपणार असल्याने त्याने रक्कम घेऊन सौदा पक्का करण्याचे ठरविले होते. मात्र तो पोलिसांच्या सापळ्यात अडकला. ढाकणे याने आणखीन किती लोकांची फसवणूक केली हे आता पोलीस तपासातच समोर येईल.
सापळा रचून केली अटक

n मारुती ढाकणे याने उमेदवार निवडून देण्यासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने आज मंगळवारी सापळा रचण्यात आला.

n मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या हॉटेल न्यू मॉडर्न टी हाऊस स्विट अॅण्ड स्नॅक्समध्ये साध्या वेशातील पोलीस आणि विरोधी पक्षनेता दानवे यांचे भाऊ शहरप्रमुख राजेंद्र दानवे मारुती ढाकणे याला भेटण्यासाठी गेले. या वेळी उमेदवार विजयी करण्यासाठी अडीच कोटी रुपये द्या, अशी मागणी केली. तडजोडीअंती दीड कोटी रुपयांमध्ये सौदा ठरला.

n ठरल्याप्रमाणे 1 लाख रुपये देण्याचे ठरले. हे लाख रुपये मारुती ढाकणे याला देताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा मारून रोकडसह ढाकणे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.