निवडणूक आयोगाची विश्वासार्हता घसरली; मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्राद्वारे व्यक्त केला संताप

पहिल्या दोन टप्प्यांमधील मतदानाच्या आकडेवारीतील तफावती प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक आयोगाला संताप व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. या आकडेवारीवरून निवडणूक आयोगाची विश्वासार्हता घसरल्याचेच दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील मतदानाची आकडेवारी उशिरा प्रसिद्ध करणे ही निवडणूक आयोगाच्या इतिहासातील पहिली घटना असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

खरगे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्र एक्सवरून प्रसिद्ध केले आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मतदानाच्या आकडेवारीचा घटनाक्रम निवडणूक आयोगाच्या संपूर्ण कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतो असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या 52 वर्षांच्या राजकीय जीवनात मी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम आकडेवारीत इतक्या मोठय़ा प्रमाणावर झालेली वाढ कधीच पाहिली नसल्याकडे खरगे यांनी लक्ष वेधले आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला तर दुसऱया टप्प्यात 26 एप्रिलला मतदान झाले, परंतु निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी 30 एप्रिलला जारी केली. परंतु मतदानाच्या 24 तासांच्या आत मतदानाची टक्केवारी यापूर्वी जाहीर केली जात होती. हे लक्षात घेतले तर असे काय बदलले की निवडणूक आयोगाला मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यासाठी इतका उशीर झाला, असा सवालही खरगे यांनी केला आहे.

अशी वाढली टक्केवारी

पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले होते. तर दुसऱया टप्प्यात 60.96 टक्के मतदान झाले होते. 20 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी आयोगाने 65.5 टक्के अंदाजित टक्केवारी जारी केली होती तर 27 एप्रिलला दुसऱया टप्प्यासाठीचा अंदाजित आकडा 66.7 टक्के इतका होता. मात्र 30 एप्रिलला जी टक्केवारी प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी 66.14 टक्के तर दुसऱया टप्प्यासाठी 66.71 टक्के इतके मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. यावरून मतदानाच्या टक्केवारीत गोलमाल असल्याचेच उघड झाले आहे.