निवडणुकीत मतदारांना चकवा देण्यासाठी डमी उमेदवार उतरवण्याची परंपरा कायम

मतदारांना चकवा देण्यासाठी एकाच नावाचे दोन-तीन उमेदवार रिंगणात उतरवण्याची सुमारे 33 वर्षांपूर्वी सुरू झालेली प्रथा अजूनही सुरू आहे. रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विरोधकांनी एकाच नावाचे उमेदवार उतरवल्यानंतर आता उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय दिना पाटील अधिकृत उमेदवार असताना आता संजय पाटील या नावाचे आणखीन दोन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत.

उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय दिना पाटील मशाल चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पण नामसाधर्म्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे संजय ब. पाटील आणि संजय पाटील नावाचे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. अन्य तीन मतदारसंघांतही हाच प्रकार घडला आहे.

अनंत गंगाराम गीते शिवसेनेचे उमेदवार

 n रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनंत गंगाराम गीते उमेदवार आहेत. पण या मतदारसंघात अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळोजी गीते हे दोन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

 n रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिह्यात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विनायक राऊत उमेदवार आहेत. पण याच मतदारसंघात विनायक लवू राऊत हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

 n हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्यजित पाटील सरुडकर  हे उमेदवार आहेत, पण या मतदारसंघात सत्यजीत पाटील हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

1991 पासून प्रथा सुरू झाली

रायगड जिह्यात प्रस्थापित उमेदवाराला शह देण्यासाठी त्याच नावाने डमी उमेदवार उभा करण्याची पद्धत तत्कालीन काँग्रेसचे नेते माजी मंत्री दत्ताजी खानविलकर यांनी शोधून काढल्याचे सांगण्यात येते. 1991 मध्ये शेकापचे दत्ता पाटील यांना शह देण्यासाठी दत्ता पाटील याच नावाने उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला होता. नामसाधर्म्यामुळे या उमेदवाराने तब्बल 15 हजार मते घेतली आणि तेव्हा शेकापच्या दत्ता पाटील यांचे पराभव झाला होता. तेव्हापासून रायगडच्या राजकारणात ही पद्धत सुरू झाली होती.  2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन ए.आर. अंतुले नावाचे उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे विजयी झाले, पण डमी नावाने अर्ज भरणारे अंतुले यांना 23 हजार मते पडली होती.