कर्नाटक भाजपाला निवडणूक आयोगाचा दणका; विरोधकांवर टीका करणारा व्हिडीओ एक्सवरून काढून टाकण्याचे निर्देश

काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करणारा ऑनिमेटेड व्हीडीओ एक्सवरून काढून टाकण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटला दिले आहेत. या व्हीडीओच्या माध्यमातून मोदी सरकार दंगल भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी भाजपाला पत्र लिहून संबंधित व्हीडीओ तत्काळ हटवण्याचे निर्देश दिले. काँग्रेसने या प्रकरणी भाजपा नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तरीही कर्नाटक भाजपाने आपल्या एक्स अकाऊंटवरून विरोधकांवर निशाणा साधणारा ऑनिमेटेड व्हीडीओ काढून टाकला नव्हता. 4 मे रोजी भाजपाने एक्सवरून व्हीडीओ प्रसिद्ध केला होता. तर 5 मे रोजी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगानेच कडक भूमिका घेत व्हीडीओ हटवण्यास सांगितले आहे.

या नेत्यांविरोधात तक्रार

व्हिडीओप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि कर्नाटकमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.