T-20 World Cup 2024 : विराटमध्ये 40 चेंडूंमध्ये शतक ठोकण्याची क्षमता, सौरभ गांगुलीचा टीम इंडियाला महत्वाचा सल्ला

पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियच्या संघाची घोषणा केली जाणार आहे. सर्व चाहते तसेच टीम इंडियाचे माजी खेळाडू आगामी विश्वचषकासाठी कोणाची निवड होणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक आणि बीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मोठे वक्तव्य केले आहे. खेळाडूंनी न घाबरता खेळले पाहिजे अस म्हणत त्यांनी टीम इंडियाला काही सल्ले दिले आहेत.

दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी आगामी टी-20 विश्वचषकासंबंधित वक्तव्य केले. “टी-20 क्रिकेट खेळण्यासाठी वयाचा कोणताच नियम नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न घाबरता खेळणे. जेम्स अँडरसन अजूनही कसोटी खेळत असून 30 षटके टाकतो. तसेच आजही महेंद्र सिंग धोनी खणखणीत षटकार ठोकतो. विशेष म्हणजे दोघांचेही वय 40च्या वर आहे, ” असे म्हणत टीम इंडियाने न घाबरता खेळले पाहिजे असे सौरभ गांगुलीने म्हटलं आहे.

“टीम इंडियाने आक्रमक खेळ करणे महत्त्वाचे आहे. रोहित, विराट, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या इ. हे सर्व प्रतिभावान खेळाडू असून त्यांच्याकडे षटकार मारण्याची चांगली क्षमता आहे, ” असे म्हणत खेळाडूंनी समतोल साधण्याची गरज असल्याचे सौरभ गांगुलीने म्हटले आहे.

“रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी विश्वचषकामध्ये सलामीला खेळायला हवे. तसेच विराटमध्ये 40 चेंडूंत शतक झळकवण्याची क्षमता आहे, ” असे म्हणत सौरभ गांगुलीने विराट कोहलीवर विश्वास दाखवला आहे.