55 व्या वाढदिवशी पुष्करचे 55 वे नाटक रंगभूमीवर

>> मंगेश दराडे

कथानकापासून ते तंत्रज्ञानापर्यंत सातत्याने नवनवीन प्रयोग मराठी रंगभूमीवर पाहायला मिळतायत. असाच काहीसा हटके प्रयोग येत्या 30 एप्रिलपासून रंगभूमीवर दाखल होणाऱया ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या 55 व्या वाढदिवशी त्याचे हे 55 वे नाटक रंगभूमीवर येतेय. नाटकातील भूमिका पुष्करला वेगळ्या ‘उंची’वर घेऊन जाईल. आता त्या ‘उंची’मागची गंमत काय, हे तुम्हाला नाटकात पाहायला मिळेल.

गेल्या काही दिवसांपासून ‘आज्जीबाई जोरात’ या महा बालनाटय़ाची चर्चा असून नाटकाच्या अनाऊन्समेंटपासून ते नाटकातील दृश्यात ‘एआय’चा वापर केला आहे. पुष्कर या नाटकात अतरंगी भूमिकेत दिसणार आहे. ‘अ’ असे त्याच्या पॅरेक्टरचे नाव असून तो मराठीतील वेगवेगळ्या बोलीभाषा बोलताना दिसणार आहे.

‘32 वर्षांच्या अभिनय प्रवासात दरवर्षी मी एकातरी नाटकात काम करतो. बालनाटय़ात काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ. उच्च दर्जाची निर्मितीमूल्ये असणाऱया नाटकाचा आपण भाग असावं अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होतेय, असे पुष्कर सांगतो. क्षितिज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित या नाटकात निर्मिती सावंत, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.

भूमिकेसाठी कसरत

‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातील पुष्करची एंट्री लक्षवेधी असून साधारण नऊ ते साडेनऊ फूट उंच अवतारात तो प्रेक्षकांसमोर अवतरणार आहे. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून नकली पाय लावून मी चालण्याची प्रॅक्टिस केली. माझ्यासाठी हे आव्हान आहे. आतापर्यंत बालनाटय़ात असा प्रयोग कुणीच केला नाही, असे पुष्कर सांगतो. सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना नाटक आवडेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

बालनाटय़ गरजेचं

आजच्या काळात हे गरजेचे नाटक आहे. हल्लीची पिढी टीव्ही, मोबाईलच्या जाळ्यात अडकलीय. गॅझेट्सच्या अतिवापराचे शरीर आणि मनावर परिणाम होतात. अशा वेळी हे नाटक तुमचे हसत खेळत मनोरंजन करेल. नाच, गाणी, धम्माल, जादू आणि भव्यदिव्यता यात अनुभवायला मिळेल. यानिमित्ताने बालवयातच मुलांमध्ये नाटकाची गोडी निर्माण होईल, असे पुष्कर सांगतो.