महाराष्ट्रातील 11 जागांसाठी आज मतदान, शिवसेनेचे पाच शिलेदार आखाडय़ात

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 11 जागांसाठी आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून या टप्प्यात शिवसेनेचे पाच शिलेदार मशाल हाती घेऊन निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले आहेत. दरम्यान, देशभरातील 95 मतदारसंघांत आज मतदान होणार आहे.

तिसऱया टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सोलापूर, सातारा, धाराशीव, लातूर, बारामती आणि माढा या मतदारसंघांत मतदान होणार आहे. रायगडमधून अनंत गीते, रत्नागिरी-सिंधुदुर्गातून विनायक राऊत, सांगलीतून चंद्रहार पाटील, हातकणंगलेतून सत्यजित पाटील तर धाराशीवमधून ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे शिवसेनेचे वाघ विजयाच्या निर्धाराने निवडणुकीच्या रणमैदानात उतरले आहेत. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती, बारामतीतून सुप्रिया सुळे, सोलापुरातून प्रणीती शिंदे, साताऱ्यातून शशिकांत शिंदे, माढय़ातून धैर्यशील मोहिते पाटील, लातूरमधून शिवाजी काळगे हे महाविकास आघाडीचे उमेदवारही विजयासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, तिसऱया टप्प्यावरही उष्णतेच्या लाटेचे सावट आहे.

– 11 मतदारसंघांत 1 कोटी 7 लाख 64 हजार 741 इतके पुरुष मतदार असून 1 कोटी 2 लाख 26 हजार 946 इतकी महिला मतदारांची संख्या आहे. या सर्व मतदारसंघांत 114 मतदान पेंद्रे संवेदनशील असून निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारीवर्ग तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

– महाराष्ट्रात 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे.

95 मतदारसंघांत होणार मतदान

देशात आतापर्यंत दोन मतदानाचे दोन टप्पे पार पडले असून 190 जागांवरील मतदान पूर्ण झाले आहे. तिसऱया टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 95 जागांवर मतदान होईल. या टप्प्यात गुजरातमधील सर्व 25 मतदारसंघांत मतदान होणार आहे. 1 हजार 351 उमेदवार या टप्प्यात आपले नशीब अजमावत आहेत.

शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती सुधारली आहे. ते गोविंदबागेत विश्रांती घेत आहेत. शरद पवार यावेळी बारामतीत मतदान करणार आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी मतदार यादीतील त्यांचे नाव मुंबईमध्ये समाविष्ट केले होते. परंतु, आता पुन्हा त्यांनी बारामतीच्या यादीत नावाचा समावेश करून घेतला आहे.

बारामतीच्या लढतीकडे देशाचे लक्ष

तिसऱया टप्प्यामध्ये महाराष्ट्रात ज्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे त्यातील बहुतांश मतदारसंघांमधील लढती या चुरशीच्या होणार आहेत. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये होत असलेल्या लढतीकडे राज्याचेच नव्हे, तर सबंध देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार रिंगणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महाविकास आघाडीचे विनायक राऊत आणि महायुतीचे नारायण राणे यांच्यातील सामना उत्सुकता वाढवणारा आहे. माढा, सांगली, सातारा, हातकणंगले, सोलापूरमधील लढतींकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.