बॉल समजून उचलला बॉम्ब; स्फोटात एका मुलाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रातिनिधिक फोटो

पश्चिम बंगालमधील हुगळीत सोमवारी मोठी दुर्घटना घडली. खेळताना बॉल समजून बॉम्ब उचलल्याने झालेल्या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 3 मुले जखमी झाले आहेत. हुगळीच्या पांडुआ येथे ही दुर्घटना घडली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लहान मुले खेळत असताना चेंडू समजून बॉम्ब उचलला आणि तो फुटला. त्यावेळी तिथे बरीच मुले खेळत होती. या दुर्घटनेत अनेक मुलं जखमी झाली.  मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दुर्घटनेत 11 वर्षीय राज विश्वास याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अन्य 3 मुलं गंभीर अवस्थेत आहेत. त्यापैकी एकाला हात गमवावा लागला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पांडुआच्या तिन्ना नेताजीपल्ली कॉलनीत तलावाच्या काठावर अनेक मुले खेळत होती. अचानक स्थानिक लोकांना स्फोटाचा आवाज आला. तिथे जाऊन पाहिलं तर समोर भयंकर दृश्य होते.  अनेक मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यानंतर त्या मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीसांचे पथक होते. पोलिसांनी याप्रकरणी आता बॉम्ब कोणी ठेवला तपास सुरु केला आहे. मृत मुलगा बर्दवान येथील असून तो काकांकडे आला होता. तर जखमी मुलांचे नाव रुपम, वल्लभ आणि सौरभ चौधरी सांगितले आहे.