नगरमधील भाजपच्या निष्ठावंतांनी गिरीश महाजनांपुढेच वाचला पाढा

ahilya-nagar-ahmednagar-lok-sabha-constituency

नगर लोकसभा मतदारसंघात विखे-पाटील कुटुंबीयांनी कशा पद्धतीने निष्ठावंत पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना वागणूक दिली. लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक घडामोडी पक्षाच्या विरोधात घडल्या, याबाबतचा  इत्थंभूत पाढाच स्थानिक पदाधिकाऱयांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे वाचला.

भाजपाने सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आमदार राम शिंदे व भानुदास बेरड हे इच्छुक होते. पक्षाने पुन्हा विखेंना उमेदवारी दिल्यानंतर ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले. विखे यांनी गेल्या पाच वर्षांत कार्यकर्त्यांना विचारले नाही. सन्मानाची वागणूक दिली नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली होती. राम शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी राधाकृष्ण विखे यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सहारा घ्यावा लागला. त्यानंतर राम शिंदे प्रचारात सहभागी झाले आहेत.

मागील चार वर्षांचा अनुभव लक्षात घेतल्यास भाजपाकडून अथवा विखे यांच्याकडून कशा चुका झाल्या, अथवा काही गोष्टी मुद्दामहून केल्या, याबाबत गिरीश महाराज यांना माहिती देण्यात आली. तसेच विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आखलेली गणिते कशाप्रकारे चुकीची आहेत. तसेच नवा-जुन्याचा वाद मिटवायला पाहिजे होता. जे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारात घेणे गरजेचे होते. आजही पदाधिकाऱयांना म्हणावे असे स्थान दिले जात नाही. किंवा विचारात घेतले जात नाही म्हणून नाराजी आहे. गिरीश महाजन हे साताऱयाकडे जात असताना, नगरमध्ये थांबले असता, काही निष्ठावंत पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ही बाब वरिष्ठांकडे मांडू, असे आश्वासन त्यांनी निष्ठावंत पदाधिकाऱयांना दिले आहे.