तलावांनी तळ गाठला… मुंबईवर पाणीकपातीचे संकट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलाव क्षेत्रांत प्रचंड उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने तलाव तळ गाठू लागले आहेत. सद्यस्थितीत सातही तलाव क्षेत्रात 245670 दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ 16.97 टक्केच पाणी शिल्लक आहे. अजून काही दिवस हीच स्थिती राहिल्यास मुंबईवर ‘जल संकट’ येण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे. याबाबत पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

मुंबईला महानगरपालिकेकडून अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या उपलब्ध असणारे पाणी जुलैपर्यंत पुरणारे दिसत असले तरी उकाडा असाच कायम राहिल्यास दहा टक्क्यांवर जलसाठा गेल्यास पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 17 ऑक्टोबरपर्यंत मान्सून बरसत होता. मात्र या वर्षी 29 सप्टेंबर रोजी पाऊस पडणे बंद झाले. यामुळे दरवर्षी वाढीव 5 ते 7 टक्के जादा मिळणारे पाणी या वर्षी मिळालेच नाही. पण 1 ऑक्टोबरपासून पाण्याचा वापर मात्र सुरू राहिला. यामुळे या वर्षी पाण्याची तूट दिसत असून मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्के कमी पाणी

z 6 मे 2022 रोजी तलावांत 377552 दशलक्ष लिटर म्हणजेच 26.09 टक्के पाणी उपलब्ध होते. तर 2023मध्ये याच दिवशी 327357 दशलक्ष लिटर म्हणजेच 22.26 टक्के पाणी शिल्लक होते. तर या वर्षी 245670 दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ 16.97 टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्के पाणीसाठा कमी आहे.
n सातही तलाव क्षेत्रात 245670 दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ 16.97 टक्केच पाणी शिल्लक आहे.
n मुंबईत 10 ते 15 टक्के पाणी कपात होण्याची शक्यता आहे. याबाबत पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

पाऊस लांबल्यास जलसंकट

या वर्षी पाणीसाठा खालावल्यामुळे पालिकेला राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा धरणातून 93 हजार 500 मिलियन लिटर व भातसा धरणातून 1 लाख 37 हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठा मिळाला आहे. हे पाणी मिळून जुलैपर्यंत पाणी पुरेल असा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र गेल्या काही वर्षांप्रमाणे पाऊस लांबल्यास जलसंकट येण्याची भीती आहे.

उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा 31435
मोडकसागर 27536
तानसा 49344
मध्य वैतरणा 21948
भातसा 104210
विहार 8331
तुळशी 2867