मुलाला विकून टाका, रुग्णालयाचे बिल माफ करू… डॉक्टरानींच केला नवजात बालकाचा सौदा

प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील रुग्णालयात नवजात बालकांना विकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुले विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे तर, नवजात मुलाला ग्वाल्हेरमधून सुखरूप पुन्हा रुग्णालयात आणले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नवजात बालकांना विकणाऱ्या या टोळीमध्ये रुग्णालयाच्या डॉक्टरांचा आणि वॉर्ड बॉयचा समावेश आहे.

हे संपूर्ण प्रकरण फिरोजाबादच्या रामगढ पोलीस स्टेशन परिसरातील न्यू लाईफ रुग्णालयातील आहे. एका नवजात बालकाची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला या रुग्णालयात उपचारांसाठी आणले होते. दरम्यान तीन दिवस त्याला रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयाचे बिल 8 हजार रुपये झाले. त्या मुलाची आई दामिनी आणि वडील धर्मेंद्र हे अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. त्यांना एवढे पैसे भरणे शक्य नव्हते. त्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन रुग्णालयातील एका वॉर्ड बॉयने धर्मेंद्र आणि दामिनी यांच्याशी संपर्क साधला.

वॉर्ड बॉयने धर्मेंद्र आणि दामिनी यांना त्यांच्या बाळाला विकण्यास सांगितले. तुम्ही मूल विकण्यास तयार असाल तर त्याच्या बदल्यात तुमचे रुग्णालयाचे बिल माफ केले जाईल आणि तुम्हाला आणखी अडीच लाख रुपये मिळतील, असे त्याने सांगितले. यावेळी त्या वॉर्ड बॉयसोबत रुग्णालयातील डॉक्टरही होते. डॉक्टर आणि वॉर्ड बॉयने मिळून ग्वाल्हेरमधील एका निपुत्रिक जोडप्याला हे बाळ विकले होते. यासाठी त्यानी धर्मेंद्र आणि दामिनीवर भरपूर दबाव टाकला.

मुलाची आई दामिनी हिला हा व्यवहार सहन न झाल्याने तिने या संपूर्ण प्रकरणाची पोलिसात तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी डॉक्टर व त्याच्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर पोलिसांना नवजात अर्भकाला ग्वाल्हेरला पाठवण्यात आल्याचे समजले. पोलिसांनी लगेच बालकाला शोधून काढले आणि त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले.