गद्दारांचा 700 कोटींचा घोटाळा रावसाहेब दानवेंनी दाबला, निवडणुकीसाठी खोतकर आणि सत्तारांशी मांडवली

raosaheb-danve

मिंधे गटाचे अर्जुन खोतकर यांच्याशी भाजपचे जालना मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी मांडवली केली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना साखर कारखाना तसेच लालबाग जिनिंगमध्ये झालेल्या 700 कोटींचा घोटाळाच दानवे यांनी दाबला आहे, असा गौप्यस्पह्ट आम आदमी पार्टीचे पैलास फुलारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी केला आहे.

भ्रष्टाचार शिरोमणी असलेले राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेकडो घोटाळय़ांनाही दानवे यांनीच राजकीय लाभासाठी संरक्षण दिले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आम आदमी पार्टीचे पैलास फुलारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश शंकपेल्ली यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या स्वार्थी तसेच मतलबी कारभाराचा पर्दाफाश केला. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना सहकारी साखर कारखाना तसेच लालबाग जिनिंगमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला. हा सर्व घोटाळा आम आदमी पार्टीने चव्हाटय़ावर आणला. त्यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर होते. ईडी चौकशीच्या भीतीने गर्भगळित झालेले अर्जुन खोतकर यांनी मिंध्यांची चाकरी सुरू केली.

खोतकरांच्या काळात झालेल्या 200 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी आपण स्वतः सर्व कागदपत्रे रावसाहेब दानवे यांना दिली. बाजार समितीच्या घोटाळय़ानंतर जालना कारखाना, लालबाग जिनिंगसह इतर संस्थांमध्ये झालेल्या घोटाळय़ाची प्रकरणाचे पुरावेही त्यांना देण्यात आले. या सर्व प्रकरणात कारवाई करण्याचा शब्द दानवे यांनी दिला होता. परंतु कित्येक महिने उलटले पण कारवाई झाली नाही. निवडणूकीत पिछाडीवर गेल्याचे लक्षात येताच रावसाहेब दानवे हे अर्जुन खोतकरांच्या चरणी लीन झाले. याचाच अर्थ राजकीय मांडवली करून त्यांनी तब्बल 700 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाला संरक्षण दिले असल्याचा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीचे पैलास फुलारी यांनी केला.