भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होणार – अंबादास दानवे

लोकसभा निवडणूक ही देशाची असते. इंदिरा गांधींसह अनेक पंतप्रधान होऊन गेले. मात्र, त्यांनी महाराष्ट्रात निवडणुकीसाठी केवळ एक ते दोन सभा घेतल्याचे दिसून येते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांना घाबरले असून, त्यांना सगळीकडे ठाकरे दिसतात. म्हणून मोदींना छोटय़ा छोटय़ा गावांसह महाराष्ट्रात तब्बल 20 सभा घ्याव्या लागल्या. पंतप्रधानांनी कितीही सभा घेतल्या तरी शिवसेनेचे मशाल चिन्ह हे विशाल विजय घेऊन जाणार असून, महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होईल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सोनई येथे झालेल्या मेळाव्यात अंबादास दानवे बोलत होते. यावेळी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार नितीन देशमुख, शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, आमदार शंकरराव गडाख, अंकित प्रभू, शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उदयन गडाख, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, तालुकाप्रमुख मच्छिंद्र मस्के, अशोक गायकवाड, ‘मुळा’चे अध्यक्ष, नानासाहेब तुवार, नानासाहेब रेपाळे, शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, बापूसाहेब शेटे, अनिल बानकर, बाबा आरगडे, जालिंदर येळवंडे आदी उपस्थित होते.

अंबादास दानवे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी मतदार मतदानाची वाट बघतोय. देशात उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भाजपला फटका बसणार आहे. येथे त्यांचे कमी खासदार निवडून येणार असले तरी भाजप चारशे पारचा नारा देत आहे. आम्ही छातीठोकपणे सांगतो की भाजप 200 पार होत नाही. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असे चित्र निर्माण झाले आहे. महागाई, बेरोजगारी, उद्योगधंद्यांबाबत यांची पूर्वीची भाषणे बघा. आज त्याच्यावर बोलायला तयार नाही. भाजपने पिकाला भाववाढ केली नाही, कांदा निर्यातबंदी केली, त्यानंतर फक्त गुजरातची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे गोंधळ उडाल्यानंतर कांदा निर्यातीला परवानगी दिली. याचा शेतकऱयांना काहीच फायदा होणार नाही. कारण बांगलादेश, अफगाणिस्तानात निर्यात केली. तेथे कांद्याला भाव अत्यंत कमी, शिवाय 40 टक्के अबकारी कर लावल्याने सरकारची शेतकरीविरोधी भूमिका दिसून येत आहे. एकंदरीत सगळीच बनवाबनवी भाजप सरकारने केली आहे. या भाजप सरकारला जनता हद्दपार करणार आहे, असे दानवे यांनी सांगितले.

आमदार शंकरराव गडाख म्हणाले, लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना दोन महिन्यांपूर्वी सोनई येथे तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना लोकसभेसाठी भूमिका विचारली. त्यावेळी 90 टक्के जनतेने आपण महाविकास आघाडीबरोबर असून, भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडून आणले पाहिजे, अशी मांडली. असे पहिल्यांदाच घडले होते. गेल्या अडीच वर्षांत मोठी अडवणूक झाली. विकासकामासाठी निधी दिला नाही. तालुका याची किंमत मोजतोय; येणारे सरकार आघाडीचेच असणार त्यामुळे आपला थांबवलेला बॅकलॉग भरून काढू, असे शंकरराव गडाख यांनी सांगितले.

आमदार सुनील शिंदे म्हणाले, ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. खासदार वाकचौरे हे निवडून येणारच आहेत. गेले 10 वर्षे कोणतेही काम न करता निक्रिय म्हणून वावरणाऱया येथील खासदाराला बाजूला सारले पाहिजे, असे सांगत आमदार शिंदे यांनी लोखंडे यांचा समाचार घेतला.

‘रामा’च्या विरोधात नाही हरामाच्या विरोधात

n प्रभू श्रीराम हे एकटय़ा भाजपचे नाहीत. आम्ही रामाच्या विरोधात नसून, हरामाच्या विरोधात आहे. भाजपने लोकसभा निवडणूक मुद्दय़ावरून गुद्दय़ावर नेण्यासाठी अनेक गोष्टी उकरून काढल्या. यांना रामाचं आणि विकासाचं काही घेणे-देणे नाही, देश हुकूमशाहीकडे नेण्याचे यांचे षडयंत्र आहे, असे दानवे यांनी सांगितले.