पियूष गोयल यांच्या विरोधात बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमकी, सोशल मीडियावर संतापाची लाट

लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईचे भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना माशांचा वास सहन होत नसल्याची बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमक्या आल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत एक्स पोस्टवरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

विजय वडेट्टीवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना माश्यांचा वास सहन झाला नाही ही बातमी केली म्हणून त्यांनी पत्रकार नेहा पुरव यांना थेट धमकी दिल्याची माहिती पुढे आली आहे. पत्रकारांना धाब्यावर घेऊन जा सांगणाऱ्या भाजपला आता निवडणुकीत पत्रकारांच्या घरी थेट गुंड पाठवण्याची वेळ आली आहे. यावरून भाजप किती घाबरली आहे हे स्पष्ट होते. भाजपला पत्रकारांची पत्रकारिता सहन होत नाही, जनतेची टीका सहन होत नाही, विरोधकांचा विरोध सहन होत नाही. भाजप नेत्यांना सहन काय होत मग? पत्रकार, विरोधकांवर दादागिरी – गुंडगिरी?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघात तब्बल 32 टक्के मराठी मतदार असून यात गावठाणे, कोळीवाड्यामधील कोळी भूमिपुत्रांचा समावेश लाखोंच्या घरात आहे. मात्र महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी कोळीवाडे, गावठाण आणि मच्छीमार्केट परिसरातील मासळीच्या वासामुळे नाकाला रुमाल लावून प्रचार केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी विविध माध्यमांवर प्रसारित झालं होतं. या भागातील प्रचाराची धुरा त्यांनी पत्नी व मुलावर सोपवल्याची माहितीही मिळत होती. प्रचारादरम्यान, गोयल यांनी नाकाला रुमाल लावल्याची बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमकी येत असल्याचं कळत आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर भाजपच्या गुंडगिरीचा निषेध होताना दिसत आहे.