पैशांच्या जोरावर महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव करता येणार नाही; संजय राऊत यांनी ठणकावले

नरेंद्र मोदी- अमित शहांसारख्या व्यापाऱ्यांना पैशांच्या जोरावर आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करत महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव करता येणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले. काही उरबडव्यांना सोबत घेत भाजप विजय मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. मात्र, आता जनता त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे राज्यात अनेक मतदारसंघात भाजपचा पराभव निश्चित आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

तपास यंत्रणांच्या मदतीने आणि नरेंद्र मोदी – अमित शहांसारख्या व्यापऱ्यांनी एकत्र येत पैशांच्या जोरावर महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. मात्र, ते शक्य नाही. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे या बारामतीतून विक्रमी मताधिक्याने विजयी होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुनित्रा पवार यांनी त्यांच्या पतिराजाने बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघ भाजप दारण पराभवाच्या छायेत आहेत. महाराष्ट्रातील अनेक विद्यमान खासदार संसदेत दिसणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने हे ठरवले आहे. तर नारायण राणे यांच्याबाबतीत पराजयाचा चौकार मारला जाईल. आम्ही त्यांचा तीनदा पराभव केला आहे. मुंबई आणि कोकणात आम्ही त्यांचा पराभव केला आहे. आता ते लोकसभेच्या मोठ्या मैदानात उतरले आहेत. या लढाईतही त्यांना चितपट केले जाईल. महाविकास आघाडीचे विनायक राऊत संसदेत जाणार आहेत. नरेंद्र मोदी किंवा अमित शहा आले तरी राज्यातील जनता त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांनी 10 वर्षे लावल्या तेवढ्या टोप्या पुरे झाल्या. आता राज्यातील जनता हे सहन करणार नाही.

नरेंद्र मोदी यांनी पेडर रोड येथे तर अमित शहा यांनी बोरीवलीत घर भाड्याने घेतल्याची माहिती मिळाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांना इथे राहायचे आहे, त्यांनी मणीपूर, कश्मीरमध्ये जायला वेळ नाही. मात्र, ते महाराष्ट्रात निवडणुका होईपर्यंत नेहमी येत आहेत. त्यांना इथे कितीही खुंट्या ठोकू द्या, महाराष्ट्रात त्यांना शिवसेनेचा पराभव करणे शक्य नाही. राज्यात हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई मोठी आहे. त्यामुळे आमच्यातील काही उरबडवे फोडून विजयाचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही, जनता त्यांच्यावर आता विश्वास ठेवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई, ठाणे, कल्याण या सर्व जागा महाविकास आघाडीच जिंकणार आहे. अजित पवार यांच्या गटाला एकही जागा मिळणार नाही. तसेच मिंध्यांची मजल भोपळा फोडण्यापर्यंत जाईल का, याबाबत शंका आहे. मोदी का परिवार याबाबत शरद पवार यांनी चांगले उत्तर दिले आहे. परिवार, कुटुंब या गोष्टी कोणी कराव्यात, ज्यांनी आयुष्यात परिवार, कुटुंब, नाती जपली आहेत, अशा लोकांनी परिवाराच्या गोष्टी कराव्यात, असेही संजय राऊत यांनी सुनावले.

अजित पवार, एकनाथ शिंदे हे डपरोक आहेत. ते खोटारडे आहेत, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार, असा सवालही त्यांनी केला. जो माणूस स्वार्थासाठी आईसारख्या शिवसेनच्या पाठीत खंजीर खुपसतो, ते डरपोक आहे. ईडी, सीबीआयच्या भीतीने ते घाबरून पळाले, हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे आता त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कशाप्रकारे फसवणूक करत आहे, हे जनता बघत आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र घेत, पक्ष बनवून निवडणुका जिंकणे, हेच त्यांचे धोरण आहे. सत्य, प्रामाणिकपणा, नैतिकता यांच्याशी त्यांचे देणघेणे नाही. गेल्या 10 वर्षात केलेल्या कोणत्या घोषणा त्यांनी पूर्ण केल्या आहेत, असा सवालही त्यांनी केला. मोदी यांनी युक्रेनचे युद्ध थांबवले, अशी अंधश्रद्धा भाजपकडून पसरवण्यात येत आहे, त्याबाबत आता युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेंस्की आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनाच विचारावे लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.