हायकोर्टाचा पोलिसांना दट्टय़ा; घोसाळकर कुटुंबीयांना, घटनेचे सीसीटीव्ही दाखवणार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या कुटुंबीयांना का नाही दाखवत, असा सवाल करत उच्च न्यायालयाने सोमवारी पोलिसांचे चांगलेच कान उपटले. त्यानंतर वठणीवर येत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घोसाळकर कुटुंबीयांना दाखवले जातील, अशी हमी न्यायालयात दिली.

घोसाळकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमावे किंवा हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी करणारी याचिका पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी दाखल केली आहे. न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पोलिसांनी हमी दिल्यानंतर न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.

काही लिड मिळाल्यास पोलिसांना सांगा

घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासाविषयी काही लिड आढळल्यास पोलिसांना त्याची माहिती द्या, असे न्यायालयाने घोसाळकर कुटुंबीयांना सांगितले आहे.

पोलीस माहिती देत नाहीत

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, आरोपींचा बँक तपशील व अन्य माहिती आम्ही पोलिसांकडे मागितली आहे. त्यासाठी रीतसर अर्ज केले आहेत. तरीही पोलीस माहिती देत नाहीत. तपासात अनेक त्रुटी आहेत, असे घोसाळकर कुटुंबीयांचे वकील भूषण महाडिक यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

आम्ही सहकार्य करण्यास तयार

पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आरोपपत्र दाखल झाले आहे. तरीही घोसाळकर कुटुंबीय तपासाची व आरोपींची माहिती वारंवार मागत आहेत. आम्ही त्यांना सर्व तपशील देण्यास तयार आहोत. सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी ग्वाही मुख्य सरकारी वकील हितेंद्र वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली.