देशातील भ्रष्टाचार कमी करण्यात मोदी सरकार अपयशी; सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा आहेर

देशात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून तो कमी करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. बियर बाइसेप्स या पॉडकास्टसाठी दिलेल्या मुलाखतीदरम्यान स्वामी यांनी सरकारच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने घेतलेले निर्णय आणि त्यांची रणनीती याबद्दल सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलही मला समस्या होती, परंतु जितकी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आहे तितकी नाही, असेही स्वामी यांनी सांगितले. दरम्यान, मोदी यांच्यासोबत अलीकडेच तुमची एखाद्या विषयावर चर्चा झाली का, असा सवाल केला असता 2020 पासून त्यांच्योसोबत पुठल्याच विषयावर चर्चा झाली नसल्याचे स्वामी म्हणाले. त्यापूर्वी आर्थिक धोरणे, देशाची स्थिती आणि चीनशी संबंधित मुद्दय़ांवर चर्चा व्हायची, असे त्यांनी सांगितले.

मोदी खोटारडे
नरेंद्र मोदी यांच्यापासून तुम्हाला काय समस्या आहे, असा सवाल युटय़ूबर रणवीर अल्लाहबादिया यांनी केला तेव्हा स्वामी यांनी मोदी हे खोटारडे आहेत, असे सांगितले. चीनने लडाखचा एक इंचही भूभाग बळकावलेला नाही असे मोदी सांगतात, परंतु ते खोटे बोलत आहेत. राम मंदिर निर्माणासाठी त्यांचे पुठल्याच प्रकारचे योगदान नसल्याचे स्वामी म्हणाले.

मोदींशिवाय लोकसभा लढवायला हवी होती
यावेळची लोकसभा निवडणूक भाजपाला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय लढवायला हवी होती, असे माझे वैयक्तिक मत आहे. भाजपा केवळ हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर ही निवडणूक जिंपू शकली असती, असा मला पूर्ण विश्वास आहे. परंतु, मोदींच्या समोर हिंदुत्वाचा मुद्दा कमजोर होतो, त्यांना भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरायला नको होते, असेही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.