उजनी कालव्याचे पाणी तत्काळ बंद करा, जलसमाधी घेण्याचा शिवसैनिकांचा इशारा

गेली दोन महिने चालू असलेल्या उजनीच्या कालव्याचे पाणी तत्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उजनी धरणाच्या कॅनॉलवर आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांत पाणी बंद न केल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला.

कार्यकारी अभियंता आर. सी. मोरे आणि उपकार्यकारी अभियंता आल्हाट यांना निवदेन देण्यात आले. यावेळी युवा जिल्हाधिकारी गणेश इंगळे, सचिन बागल आणि युवा जिल्हा समन्वयक किशोर देशमुख, सोमनाथ ढवळे, शुभम फुगे, अशोक माने, विठ्ठल आबा मस्के, रणजित पवार, गुणा वाघ, विनोद निर्धार, ओम पराडे, युवराज पवार, सागर साळुंखे, सूरज जाधव, जीवन राऊत, सुनील ढगे, श्रीकांत मासुळे, तेजस निंबाळकर, युवराज गोरे, प्रवीण झिंगे, सूरज तोडकरी, शाहरुख आतार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, सोलापूर जिह्यातील काही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची दिशाभूल करून उजनी कालव्याचे आवर्तन लांबवले. यंदा उजनी धरण 66 टक्के भरलेले होते. पण, नियोजनशून्य कारभारामुळे व लोकप्रतिनिधींच्या मनमानीमुळे 90 दिवसांत धरणातील 47 टक्के पाणी संपले आहे. सध्या फक्त 19 टक्के पाणीसाठा असून, फेब्रुवारी व मार्च महिन्यात रब्बीसाठी मिळणाऱया दुसऱया आवर्तनाच्या आशा मावळू लागल्या आहेत.

1 नोव्हेंबरला सोडलेले पाणी 30 नोव्हेंबरला बंद करण्याचे ठरवले असताना ते आज डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा संपत आला तरी पाण्याचे आवर्तन चालू आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. डिसेंबरअखेर सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडणार असून पाच ते सहा टीएमसी पाणी कमी होऊन धरण मायनसच्या जवळ पोहोचणार आहे.

सध्या हिवाळ्याचे दिवस असतानाही पाणी पातळी झपाटय़ाने कमी होत आहे. येणाऱया काळात उजनी लाभक्षेत्रातील ऊस, केळी, फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. येणाऱया दोन दिवसांत उजनी कॅनॉलचे पाणी बंद न केल्यास जलसमाधी घेण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.