बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या! – उद्धव ठाकरे

‘प्रधानमंत्री फसल योजना’ हा मोठा घोटाळा असल्याची शंका यायला लागली आहे. 1 रुपयात पिकविमा मिळणार म्हणून आधी 90 लाखांच्या आसपास शेतकरी पिकविमा घ्यायचे, पण आता ही संख्या पावणे दोन कोटींच्या घरात गेली आहे. यात शेतकऱ्यांच्या हिस्सा म्हणून राज्यसरकार जवळपास 8 हजार कोटी पिकविमा कंपन्यांच्या बोडक्यावर घालते. एवढे करूनही विमा कंपन्यांची कार्यालये बंद असून फोनही घेत नाहीत आणि दादही देत नाहीत. ते ना सरकारचे ऐकताहेत, ना शेतकऱ्यांना सामोरे जाताहेत. त्यामुळे हा पैसा या कंपन्यांच्या माध्यमातून कोणाचा खिशात गेला याचा शोध घेतला पाहिजे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

हिंगोली, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी अवयव विक्रीला काढले आहेत. या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आणि कर्जाएवढी रक्कम देऊन कर्जमुक्त करण्याची विनंती केली. त्यासाठी ते मुंबईत आले होते, मात्र त्यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. खासदार अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी शिवसैनिकांसह आझाद मैदान पोलीस स्थानकात धडक देत या शेतकऱ्यांची सुटका केली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा सांगितल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.

मी मुख्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशनात दोन लाखांपर्यंची कर्जमुक्ती केली होती. आता शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा बोजा वाढला असून नुकसान भरपाई, पंचनाम्याचा खेळ आता थांबवा. एकतर सरसकट नुकसान भरपाई द्या किंवा कर्जमुक्ती द्या. आम्ही वापरलेली पद्धतच अवलंबवा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही शिवसेनेची आग्रही मागणी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

जानेवारी, फेब्रुवारीच्या सुमारास लोकसभेचे वेध लागतील. आचारसंहिता लागू होईल. मग दिल्लीतील, जगभरातील भाजपचे लोकं इकडे येतील आणि आश्वासने देत सुटतील. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू असताना गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते, ते आता मतदान संपताच वाढवण्यात आले. एवढा खोटारडेपणा यापूर्वी देशात कधीच नव्हता. त्यामुळे या सरकारचे करायचे काय हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. शेतकरी म्हणून एकत्र उभे रहा आणि अन्नदात्याची ताकद  घटनाबाह्य सरकारला दाखवून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बळीराजा बांधवांना केले. या सरकारने सगळंच विकायला काढलंय, तुम्ही अवयव विकण्याचा अविचार मनात आणू नका. दुःखात खचून जाऊ नका, शिवसेना नेहमी तुमच्यासोबत आहे, असा आधारही उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.

स्वत:च्या राज्यात शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त होत असताना दुसऱ्याच्या घरात धुणीभांडी करायला जाणारे राज्यकारभासाठी नालायक आहेत, असा आसूडही उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर ओढला. दिवाळीच्या आधी पिकविम्याचे पैसे देणार असे सरकार म्हटले होते. पण आता शेतकऱ्यांची अवयव विकण्याची मानसिकता झाली आहे. गद्दारी करून सरकार पाडले, जबाबदारी घेतली आहेत, तर जबाबदारी पार पाडा. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.