मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा वाढीव खर्च, निकृष्ट कामाची चौकशी करा, शिवसेनेने झळकावले निषेधाचे फलक; आदित्य ठाकरे यांनी केला होता पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्यामुळे पुलाचा वाढीव खर्च आणि निकृष्ट कामाची चौकशी करा अशी मागणी शिवसेनेने आज केली. पालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगरसेवकांनी आज पुलावर धडक देत उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाची पोलखोल करीत निषेधाचे फलक झळकावले. मृणालताई गोरे पुलाचे काम अर्धवट आणि निकृष्ट असताना सत्ताधाऱ्यांनी उद्घाटनाची घाई केल्याचा पर्दाफाश शिवसेना नेते –युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला होता.

उड्डाणपुलाचे उद्घाटन डोळे झाकून केल्यानंतर आता जागे झालेल्या महापौर रितू तावडे यांचा पाहणी दौरा म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आणि नौटंकी असल्याची टीकादेखील पेडणेकर यांनी केली आहे. यावेळी शिवसेना नगरसेविका विशाखा राऊत, नगरसेवक शैलेश फणसे, सुहास वाडकर, अंकित प्रभू, नगरसेविका लोना रावत, लक्ष्मी भाटिया, हर्षला मोरे, सारिका झोरे, माधुरी मांजरेकर, चिंतामण निवाते, जितेश राऊत, सचिन पाटील, किरण तावडे, प्रमोद सावंत, तुळशीराम शिंदे आदी उपस्थित होते.

पालिकेचाच अहवाल सांगतो, कामात अनेक त्रुटी

मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत असतानाच पालिकेच्या 2021 मधील दक्षता विभागाने दिलेल्या अहवालात पुलाच्या बांधकामात गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट केले आहे. या अहवालात भविष्यात तडे जाण्याची शक्यता, हनीकॉम्बिंग, निकृष्ट दर्जाचे काँक्रीट, अपुरी देखरेख आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा उल्लेख करण्यात आला होता. यातच उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर अवघ्या 24 तासांत रस्त्यावरील उखडलेले भाग आणि पॅचवर्कचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पुलाचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.