मुलुंडच्या पोपटलालविरुद्ध पाच महिलांची तक्रार

संजय राऊत यांचा सोमय्यांवर हल्लाबोल, पीडित महिलांना जनता दरबारात उभे करणार

मुलुंडचे पोपटलाल किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी पाच महिला पुढे आल्या आहेत, अशी खळबळजनक माहिती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज दिली. या पाचही महिलांचे सोमय्यांकडून शोषण झाले असून त्या महिलांना लवकरच जनता न्यायालयात उभे करू, त्याच सर्वकाही सांगतील, असा गंभीर इशाराही संजय राऊत यांनी दिला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळातील खिचडी वाटप घोटाळय़ावरून शिवसेनेवर टीका केली होती. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेतून त्याला प्रत्युत्तर देताना किरीट सोमय्या, मिंधे सरकार अशा सर्वांचाच समाचार घेतला. मध्यंतरी सोमय्या यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यापेक्षाही गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत, पाच महिलांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे, आम्ही राजकारण कुटुंबापर्यंत नेत नाही, पण सोमय्या यांच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही, असे संजय राऊत म्हणाले.

खिचडी घोटाळय़ातील लाभार्थीचे वर्षा आणि देवगिरीवर कॅटरिंग

खिचडी घोटाळय़ातील लाभार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आणि उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्यावर वीस कोटींची खोटी बिले काढून त्यांचे कॅटरिंग सुरू आहे. मिंधे गटाच्या एका खासदाराची त्यात पार्टनरशिप आहे. सूरज चव्हाण यांचे व्यवसायातील भागीदार आज शिंदे गटात आहेत, त्यांच्यावर कारवाई का नाही? सध्या मिंधे गटात असलेले अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल हे या खिचडी घोटाळय़ातील लाभार्थी आहेत असे संजय राऊत म्हणाले. सोमय्यांना जर घोटाळय़ावर बोलायचे असेल तर त्यांनी आठ हजार कोटींचा अॅम्बुलन्स घोटाळा, गुजरातला पळवलेले उद्योग, राहुल कुलचा 500 कोटींचा मनी लॉण्डरिंग घोटाळा, 70 हजार कोटीं सिंचन घोटाळा, हसन मुश्रीफ यांच्यावर बोलायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.

सोमय्यांना मिळालेल्या देणग्यांची यादी जाहीर करा

दोन-पाच लाख रुपयांच्या चौकशीसाठी ईडीकडून आमचे नेते वेठीस धरले जात आहेत, एवढी ईडीची पातळी घसरली का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्या यांची आमच्यावर आरोप करण्याची लायकी नाही, सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठान संस्थेने धमक्या देऊन कोटय़वधींच्या देणग्या गोळा केल्या. मेट्रो डेअरी, मोतीलाल ओसवाल यांच्याविरोधात सोमय्यांनी मोहीम उघडली होती आणि नंतर त्यांच्याकडून सोमय्यांच्या संस्थेला मोठय़ा देणग्या मिळाल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांनी त्याची यादी जाहीर करावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

विक्रांत बचाव प्रकरणात सोमय्या यांनी कोटय़वधी रुपये गोळा केले. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद केल्यानंतर सोमय्या बापबेटे पळून गेले होते. भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला गेला. हिंमत होती तर सोमय्यांनी त्याचवेळी चौकशीला सामोरे जायला हवे होते, असेही संजय राऊत म्हणाले.